सोहळा आणि वादविवाद….! – ह.भ.प. रामकृष्ण हनुमंत महाराज वीर, वारकरी संप्रदाय पाईक संघ, पंढरपूर

‘सुखालागी करीसी तळमळ। तरी तू पंढरीसी जाय एक वेळ ॥’ हा संतउपदेश प्रमाण मानून लाखो वारकरी त्यांच्या जीवनाचा परमोच्च आनंद घेण्यासाठी आषाढी वारीच्या निमित्ताने संतांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होतात. गेल्या काही वर्षांत असे लक्षात येत आहे की, विशेषत्वाने ‘श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्या’त प्रतिवर्षी काही ना काही वादविवाद निर्माण होत आहेत आणि सोहळ्याला गालबोट लागले जात आहे. याचे तीव्र दुःख आहे. नेमके काय कारण आहे ? असा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता. काही निरीक्षणे समोर आली.

१. निरीक्षण क्रमांक १

या वर्षी सोहळ्यात कुणाला ‘लक्ष्य’ करायचे, हे बहुतेक वारीच्या अगोदरच ठरवलेले असते आणि ठरल्याप्रमाणे ते ‘आळंदी ते पुणे’ या ‘कव्हर’ आणि ‘कव्हरेज’ मिळणार्‍या सुरक्षित प्रभागात घडवलेही जाते. हा गेल्या काही वर्षांत ‘श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्या’तील ठरवून केला गेलेला प्रकार आहे.

२. निरीक्षण क्रमांक २

यात प्रामुख्याने एक विशेष गोष्ट अशीही दिसते की, ज्या वर्षी ज्या विशिष्ट लोकांकडे काही विशिष्ट अधिकार येतात, त्यावर्षीच आवर्जून अशी प्रकरणे घडतात.

३. निरीक्षण क्रमांक ३

वारकरी संप्रदाय विशिष्ट विचारधारेचा नसून तो कसा ‘मोकळा ढाकळा’, आहे, हे पटवून देण्यासाठी काही विशिष्ट विचारधारेचे लोक ज्या लोकांपासून आपल्या कार्यास धोका होऊ शकतो, अशांना ‘लक्ष्य’ करण्याच्या प्रयत्नात असतात. सर्व घडवण्यामागे काही विशिष्ट शक्ती असाव्यात; मात्र संप्रदायातील काही घटक यात सामील आहेत का ? या शंकेला वाव आहे.

या वर्षी केवळ ‘लक्ष्य’ पालटलेले आहे; मात्र घडणार्‍या घटना तशाच आहेत. शेष सोहळ्यामध्ये शिस्तीचे नियम सांगण्याचा ‘श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज संस्थान’च्या विश्वस्तांना पूर्ण अधिकार आहे. सोहळ्यातील ३ मुख्य मानकरी ह.भ.प. आरफळकर मालक, शितोळे सरकार आणि वासकर महाराज हे वारकरी संप्रदायाचे प्रधान प्रतिनिधी, तसेच सोहळ्यातील शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या अनेक प्रमुख दिंडींचे/फडाचे मालक, जोपर्यंत कोणताही आक्षेप नोंदवत नाहीत, तोपर्यंत सर्वसामान्य वारकर्‍यांच्या मनात ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या विषयी कसलाच किंतु-परंतु येणार नाही. सोहळा शिस्तबद्धतेसाठी कठोर निर्णय घ्यायलाच हवेत ! त्यामुळे याक्षणी आम्ही विश्वस्त मंडळाच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत.

आपली सर्व प्रपंचातील दुःखे बाजूला ठेवून ‘वारीत’ आनंदानुभूती घेण्यासाठी आलेल्या सर्वसामान्य वारकर्‍यांच्या ध्यानीमनी केवळ ‘ज्ञानोबा-तुकोबाराय’ आणि ‘पंढरीची ओढ असते’, त्याला या सर्व प्रकारांची पुसटशीही कल्पना नसते. त्यामुळे या सर्वसामान्य वारकर्‍यांच्या वतीने प्रार्थना करतो ‘जे खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रती वाढो ॥