येत्या ४ वर्षांत एस्.टी.ला नफ्यात आणणार ! – प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री

प्रताप सरनाईक 

मुंबई – मागील अनेक वर्षे सातत्याने तोट्यात असलेल्या एस्.टी. महामंडळाला येत्या ४ वर्षांत नफ्यात आणण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही परिवहनमंत्री आणि एस्.टी. महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. २३ जून या दिवशी घोषित करण्यात आलेल्या एस्.टी. महामंडळाच्या आर्थिक श्वेतपत्रिकेवर भाष्य करतांना हा विश्वास व्यक्त केला.

प्रताप सरनाईक म्हणाले, ‘‘मागील ४५ वर्षांमध्ये केवळ ८ वर्षे एस्.टी. महामंडळ काही प्रमाणात नफ्यात होते. राज्यातील ९० टक्के नागरिकांसाठी एस्.टी. महामंडळ ही महाराष्ट्राची लोकवाहिनी आहे. नियमित सुमारे ५५ लाख प्रवाशांना सुरक्षित दळणवळण सेवा देणारी एस्.टी. भविष्यात आर्थिकदृष्ट्या सक्षम असणे काळाची आवश्यकता आहे. वर्ष २०१८-१९ मध्ये एस्.टी. संचित तोटा ४ सहस्र ६०० कोटी रुपये होता; परंतु कोरोना महामारीच्या काळात दळणवळण बंदीमुळे आणि नंतर चालेल्या कर्मचार्‍यांच्या दीर्घकालीन संपामुळे संचित तोटा १० सहस्र ३२२ कोटी रुपयांपर्यंत पोचला आहे. यामध्ये कर्मचार्‍यांची देणी ३ सहस्र कोटी रुपयांपर्यंत आहेत. शासनाने एस्.टी. महामंडळाला साहाय्य करणे अत्यंत आवश्यक आहे. एस्.टी. अधिकारी आणि कर्मचारी यांनीही संस्थेचा आर्थिक तोटा अल्प करण्यासाठी, कामाची उत्पादकता वाढवणे आणि योग्य ठिकाणी काटकसर करून बचत करणे आवश्यक आहे.’’