गोवा वर्ष २०३७ पर्यंत विकसित राज्य होणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

कार्यशाळेत करिअर निवड या विषयावरील पुस्तिकेचे प्रकाशन करतांना डावीकडून प्रा. मनोज कामत, सौ. पल्लवी धेंपो आणि मुख्यमंत्री सावंत

पणजी, २३ जून (वार्ता.) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वर्ष २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवायचे आहे आणि यात सहभाग म्हणून १० वर्षे आधी म्हणजे वर्ष २०३७ पर्यंत गोवा विकसित बनवण्याचा आमचा निर्धार आहे. यासाठी प्रत्येक गोमंतकियाचा सक्रीय सहभाग अत्यंत आवश्यक आहे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

कुजिरा, बांबोळी येथील धेंपो महाविद्यालयात आयोजित केलेल्या ‘विकसित भारत – २०४७’ या कार्यशाळेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते. या प्रसंगी धेंपो महाविद्यालयाच्या विश्वस्त सौ. पल्लवी धेंपो, सांख्यिकी आणि नियोजन खात्याचे संचालक विजय सक्सेना, महाविद्यालयाचे प्राचार्य मनोज कामत आणि इतर पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले,
‘‘वर्ष २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचे सामूहिक ध्येय आहे. या व्यापक राष्ट्रीय उद्दिष्टाच्या अनुषंगाने गोव्याने स्वत:साठी वर्ष २०३७ पर्यंत विकसित होण्याचे लक्ष्य ठेवले आहे. भारताला आर्थिक, सामाजिक, तांत्रिक आणि पर्यावरण यांच्या दृष्टीने समृद्ध अन् आत्मनिर्भर राष्ट्र बनवण्याचा उद्देश आहे. याचा प्रारंभ गोव्यातून झाला पाहिजे.’’

औद्योगिक धोरणात महिलांना प्रोत्साहन देणार

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले, ‘‘राज्यात महिलांना रात्रपाळीत काम करण्यासाठी सक्षम वातावरण निर्माण केले जात आहे. औषधनिर्मिती, माहिती तंत्रज्ञान, खासगी उद्योग आणि सेवा क्षेत्र यांमध्ये महिलांचे योगदान वाढवण्याच्या दृष्टीने सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील महिलांना अधिक संधी देऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचा हा प्रयत्न आहे. यासाठी सुरक्षित आणि विश्वासार्ह वाहतूक (परिवहन) सेवा उपलब्ध केली जाणार आहे.

महिलांना रात्री कामावरून घरी सुरक्षितपणे पोचवण्यासाठी खास परिवहन योजना राबवली जाणार आहे. यामध्ये सीसीटीव्ही, जीपीएस्, महिला सुरक्षारक्षक आणि तांत्रिक सुविधा असणार आहेत. सार्वजनिक आणि खासगी भागीदारीतून ही सेवा उभारण्यात येणार आहे. औषधनिर्मिती आणि खासगी क्षेत्र यांमध्ये महिला कर्मचारी वाढवण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी रात्री काम करणार्‍या महिलांसाठी खास सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वे लागू केली जाणार आहेत. नवीन औद्योगिक धोरणात महिलांसाठी प्रोत्साहनपर योजनांचा समावेश असेल.’’

विद्यार्थ्यांना राष्ट्रनिर्मितीसाठी सक्षम करणे, हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट ! – सौ. पल्लवी धेंपो, विश्वस्त, धेंपो महाविद्यालय

सौ. पल्लवी धेंपो

याप्रसंगी सौ. पल्लवी धेंपो म्हणाल्या, ‘‘धेंपो महाविद्यालयाकडून राष्ट्रीय विकास उद्दिष्टांशी सुसंगत दृष्टी आणि ध्येय निश्चित करण्यात आले आहे. दर्जेदार शिक्षण, कौशल्य विकास, नवकल्पना आणि समाजाचा सहभाग यांवर भर दिला जात आहे. विद्यार्थ्यांना राष्ट्रनिर्मितीसाठी सक्षम करणे, हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे.’’