नवी देहली – इराणवर आक्रमण करण्यासाठी अमेरिकेने आमच्या हवाई सीमेचा वापर केला नाही, असा खुलासा भारताने केला. अमेरिकेने इराणविरुद्ध राबवलेल्या ‘ऑपरेशन मिडनाईट हॅमर’साठी भारतीय हवाई सीमेचा वापर केल्याचे वृत्त ‘एक्स’सह सर्व सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाले. यानंतर भारताने खुलासा करत हे वृत्त धादांत खोटे असल्याचे स्पष्ट केले. ‘अमेरिकेने ना भारताच्या हवाई सीमेचा वापर केला, ना अमेरिकेच्या कारवाईत भारत सरकारचा कुठला सहभाग आहे’, असे भारताने स्पष्ट केले.
या वेळी भारताने ‘यूएस् जॉइंट चीफ ऑफ स्टाफ चेअरमन’ यांच्या पत्रकार परिषदेचा संदर्भ देत ‘अमेरिकेच्या विमानांनी इराणवर आक्रमण करण्यासाठी कुठला पर्यायी मार्ग निवडला ?’, याची सविस्तर माहिती दिली आहे’. त्यामुळे सामाजिक माध्यमांवरील वृत्ते तथ्यहीन असल्याचेही भारताने सांगितले.