Strait Of Hormuz : इराणकडून होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्याच्या हालचाली; अमेरिकेचे चीनला साकडे !

  • जागतिक तेल आणि वायू यांची या मार्गाने होते २० टक्के वाहतूक

  • अनेक देश धास्तावले

तेहरान (इराण) – इराणकडून फारसच्या आखाताला अरबी समुद्राशी जोडणारा अरुंद असलेला ‘होर्मुझ सामुद्रधुनी’ बंद करण्याच्या हालचाली चालू करण्यात आल्या आहेत. इराणच्या ‘प्रेस टीव्ही’ने प्रसारित केलेल्या अहवालात म्हटले आहे की, इराणच्या संसदेने होर्मुझचा जलमार्ग बंद करण्याला संमती दिली आहे. या मार्गाद्वारे जागतिक तेल आणि वायू यांची अनुमाने २० टक्के वाहतूक होते. परिणामी इराणच्या या निर्णयामुळे जगातील अनेक देश धास्तावले आहेत.

यासाठी अमेरिकेने चीनकडे साहाय्य मागितले आहे. अमेरिकेचे परराष्ट्र्रमंत्री मार्को रुबियो यांनी २२ जून या दिवशी ‘फॉक्स न्यूज’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ‘चीनने इराणला होर्मुझ जलमार्ग बंद न करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे’, असे आवाहन चीनला केले आहे. ते म्हणाले की, या प्रकरणी मी चिनी सरकारला इराणशी बोलण्यासाठी प्रोत्साहित करीन; कारण चीनदेखील होर्मुझच्या जलमार्गाद्वारेच मोठ्या प्रमाणात तेलाची आयात करतो. तथापि अमेरिकेच्या या विनंतीवर चीनने अद्यात कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.

आमच्यावर नव्हे, इतर देशांवर अधिक परिणाम होईल ! – अमेरिका

रुबियो पुढे म्हणाले, ‘‘इराणने जर ही सामुद्रधुनी बंद केली, तर ही त्याची आणखी एक भयंकर चूक असेल. असे केल्यास त्याच्यासाठी ही ‘आर्थिक आत्महत्या’ ठरेल. ही सामुद्रधुनी बंद केल्यास उद्भवणार्‍या परिस्थितीचा सामना करण्यासाठी आमच्याकडे अनेक पर्याय आहेत; परंतु इतर देशांनीही याचा विचार करावा. इराणच्या निर्णयामुळे इतर देशांच्या अर्थव्यवस्थांची आमच्या तुलनेत प्रचंड हानी होईल. जलमार्ग बंद करण्याचे पाऊल फार मोठे आहे. यासाठी अमेरिका आणि इतर देशांची प्रतिक्रिया अत्यंत महत्त्वाची ठरेल.’’

इराणने आमच्यावर आक्रमण केल्यास ती त्याची आतापर्यंतची सर्वांत मोठी चूक असेल !

अमेरिकेने केलेल्या आक्रमणानंतर इराणही स्वतःचा बचाव करण्यासाठी पुढे सरसावला आहे. इराणने अमेरिकेला या आक्रमणाची तिला मोठी किंमत चुकवावी लागणार असल्याची थेट धमकी दिली आहे. यावर रुबियो म्हणाले, ‘‘इराणने जर आमच्यावर आक्रमण केले, तर ती त्याची आतापर्यंतची सर्वांत मोठी चूक असेल. अमेरिका इराणशी चर्चा करण्यास सिद्ध आहे.’’