US Advisory Against India : बलात्काराच्या आणि गुन्हेगारीच्या घटनांमुळे भारतात अमेरिकेच्या महिलांनी एकटीने प्रवास करू नये !

अमेरिकेच्या सरकारचा भारताविषयी वादग्रस्त आदेश !

वॉशिंग्टन – भारतात घडणार्‍या बलात्काराच्या आणि गुन्हेगारीच्या घटनांमुळे अमेरिकेच्या सरकारने भारतात प्रवास करणार्‍या अमेरिकी महिलांना सावधानतेची चेतावणी दिली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांच्या सरकारने भारताविषयी प्रसारित केलेल्या वादग्रस्त आदेशात म्हटले आहे की, बलात्कार हा भारतातील सर्वांत वेगाने वाढणार्‍या गुन्ह्यांपैकी एक आहे आणि लैंगिक छळासह हिंसक गुन्ह्यांची प्रकरणे पर्यटन स्थळे अन् इतर ठिकाणी नोंदवली जात आहे. अशा ठिकाणी प्रवास करणार्‍या अमेरिकेच्या नागरिकांनी, विशेषतः महिलांना सावधगिरी बाळगावी, असे या आदेशात म्हटले आहे.

१. ट्रम्प सरकारने १६ जून या दिवशी प्रसारित केलेल्या मार्गदर्शक सूचीमध्ये म्हटले आहे की, पूर्व महाराष्ट्र आणि उत्तर तेलंगणा ते पश्चिम बंगालपर्यंत पसरलेल्या ग्रामीण भागांत आपल्या नागरिकांना आपत्कालीन सेवा पुरवण्याची अमेरिकन सरकारची क्षमता मर्यादित आहे.

२. भारतातील मोठ्या भागांत माओवादी आतंकवादी गट किंवा नक्षलवादी सक्रीय आहेत. तेलंगाणा, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार, बंगाल, ओडिशा,  छत्तीसगड, झारखंड इत्यादी राज्यांच्या ग्रामीण भागांत भारतीय सरकारी अधिकार्‍यांवर आक्रमणे चालूच आहेत, असे या मार्गदर्शक सूचीत म्हटले आहे.

३. भारतात काम करणार्‍या अमेरिकेच्या सरकारी कर्मचार्‍यांनी बिहार, झारखंड, छत्तीसगड, बंगाल, मेघालय, ओडिशा इत्यादी राज्यांच्या ग्रामीण भागांत प्रवास करण्यापूर्वी अनुमती घ्यावी.

४. अमेरिकेच्या नागरिकांना वांशिक हिंसाचाराने प्रभावित मणिपूरला प्रवास न करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. तसेच त्यांना जम्मू आणि काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशात प्रवास न करण्याचाही सल्ला देण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका

अमेरिकेत काळ्या-गोर्‍यांचा वाद कायमच शिगेला असतो, इतका की तेथील गोरे पोलीस काळ्या लोकांचा जीव घेतात. मग आता भारतानेही अमेरिकेतील भारतीय नागरिकांसाठी अशा प्रकारची मार्गदर्शक सूचना प्रसारित केली पाहिजे !