संत सोपानदेव महाराजांच्या पालखीचे सासवड येथून प्रस्थान !

समाधी मंदिरातून पालखी निघतांना

पुणे, २३ जून (वार्ता.) – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांचे धाकटे बंधू संत सोपानदेव महाराजांच्या पालखीने सासवड येथून पंढरपूरकडे प्रस्थान केले. या वेळी सासवड येथील समाधी मंदिरात प्रस्थानाचे कीर्तन झाले.

समाधी मंदिरातून पालखी निघतांना

समाधी मंदिराशी संबंधित काही महाराजांच्या सन्मानाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर संत सोपानकाका यांचा जयजयकार करत, श्री विठ्ठल नामाचा आणि ग्यानबा-तुकारामच्या जयघोषात पालखी मंदिराबाहेरील रथाजवळ आणण्यात आली. उपस्थित महिला भाविकांनी फुगड्या घालून आणि वारकर्‍यांनी भक्तीभावयुक्त नृत्य केले. पालखी नाचवण्यात आली, नंतर बैलगाडी जोडलेल्या रथावर पादुकांना स्थानापन्न करण्यात आले आणि हा रथ नंतर पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाला. या वेळी वारकरी मोठ्या संख्येत उपस्थित होते. ही पालखी मांडकी, निंबूत, सोमेश्वरनगर, बारामती, अकलूज या मार्गाने पंढरपूरमध्ये प्रवेश करील.

समाधी मंदिरातून पालखीच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येत जमलेले वारकरी आणि भाविक
२३ जून या दिवशी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांचा पालखी सोहळ्याचा दिवसभर मुक्काम सासवड येथे होता. २४ जून या दिवशी पालखी सोहळा जेजुरीच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे. सासवड येथील मैदानात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने वारकरी आणि भाविक यांनी गर्दी केली होती. या पालखी सोहळ्यासमवेत ४०० हून अधिक दिंड्या आणि लाखो वारकरी आहेत. या सर्वांच्या सासवड येथील वास्तव्यामुळे सासवड भागाला एका मोठ्या तीर्थक्षेत्राचे आणि यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.