नवकल्पना, सर्व्हे आणि अभ्यास यांविना तुम्ही मोठे उद्योजक होऊ शकत नाही ! – दीपक घैसास, आय-फ्लेक्स सोल्यूशन्सचे संचालक

दीपप्रज्वलन करतांना दीपक घैसास आणि अन्य उद्योजक

रत्नागिरी – वर्तमानात आणि भविष्यातही लोक विचार करणे सोडून देतील; कारण तुम्हाला तयार विचार मिळतील; पण ज्ञान मिळणार नाही. आपण एखाद्या टॅक्सीत बसलो की, आपल्याला गाडी चालवण्याची माहिती आहे; पण तुम्ही कृती करत नाही. त्याप्रकारे लोक विचार सोडतील. त्यामुळे यश मिळवण्यासाठी स्वतःच्या कमतरता लक्षात घ्या. आपल्या व्यवसायाची ‘वेबसाईट’ असली पाहिजे. एक्सेल, वर्ल्ड आणि आता ‘एआय’ची साथ घ्या. सर्व्हे, अभ्यास, नवकल्पना यांविना तुम्ही मोठे उद्योजक होऊ शकत नाही. गूगलवर माहिती घ्या. पेटंट मिळवण्यासाठी प्रयत्न करा. असे प्रतिपादन आय-फ्लेक्स सोल्यूशन्सचे संचालक दीपक घैसास यांनी केले.
अंबर हॉलमध्ये के.बी.बी.एफ्.आयोजित केलेल्या ग्लोबल मीट कार्यक्रमात ‘जागतिक अस्थिरतेचा व्यावसायिक परिणाम, संधी आणि आव्हाने’ यावर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. ग्लोबल मीटचे उद्घाटन श्री. घैसास यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. या वेळी उद्योजक रवींद्र प्रभुदेसाई, दीपक गद्रे, डॉ. श्रीधर ठाकुर, श्रीपाद खेर, के.बी.बी.एफ्.चे (के.बी.बी.एफ्.(कर्‍हाडे ब्राह्मण बेनव्होलंट फाऊंडेशन)) ग्लोबल अध्यक्ष प्रदीप जोशी, उपाध्यक्ष योगेश मुळ्ये, खजिनदार वैशाली वरणेकर, सचिव भागवत, रत्नागिरी शाखाध्यक्ष सुहास ठाकुरदेसाई उपस्थित होते.

डावीकडून दीपक घैसास यांचा सत्कार करतांना प्रदीप जोशी

श्री. घैसास पुढे म्हणाले की,

१. अमेरिका, चीन हे देश आर्थिक महासत्ता आहेत. चीनकडून सुटे भाग निर्यात होतात; परंतु गेल्या २ वर्षांत ही बाजारपेठ भारताने मिळवली आहे. पुढील १० वर्षांत भारत मोठे उत्पादन करणारा जगातला मोठा देश बनणार आहे. एक वर्षात दिसणारी ही गोष्ट नसून त्याकरता काही वर्षे द्यावी लागतील.

२. छोट्या देशांना आत्मनिर्भर होणे शक्य नाही; परंतु भारत आत्मनिर्भर होणार आहे. जगात चालू असलेली युद्धे यासह अमेरिकन सरकारच्या धोरणांचे आंतरराष्ट्रीय पातळीवर आणि आपल्या व्यवसायावर काय परिणाम होतील, याचा अभ्यास केला पाहिजे.

३. एकच गोष्ट करून आस्थापनाला यश मिळत नाही. सातत्याने पालट करावा लागतो. एकट्याने व्यवसाय करण्यापेक्षा मित्राला समवेत घ्या. तुमच्या कमतरता लक्षात घेऊन मित्र त्या गोष्टीत हुषार असेल, तर दोघांची चांगली साथ एकमेकांना मिळते. अन्यथा एकमेकांशी स्पर्धा होते.

४. पैसा हे सर्वस्व नाही, असे आपल्या मनावर लहानपणापासून ठसवले गेले; परंतु आपल्याला १०० कोटी रुपयांच्या वर व्यवसाय केला पाहिजे, याकरता ब्राह्मणांनी उद्दिष्ट ठरवावे. संधी कधीही येते, त्यामुळे डोळे जागृत ठेवा. ब्राह्मण समाजाला आरक्षण नाही, त्यामुळेच ही मोठी संधी आहे आणि यातूनच ब्राह्मण समाजाचा उत्कर्ष झाला आहे. समाजातील अन्य घटकांनाही समवेत घेऊन जाणे, हे ब्राह्मणांचे वैशिष्ट्य आहे, ‘ग्लोबल मीट’ ही आंतरराष्ट्रीय पातळीवर न्या.

के.बी.बी.एफ्’ची ‘ग्लोबल मीट’साठी उपस्थित उद्योजक

५. सध्या बाजारात पैसा भरपूर आहे. भारतीय लोक जुगाड करण्यात हुशार आहेत. एका जर्मन आस्थापनाच्या यंत्रामध्ये बिघाड झाला. त्या वेळी आस्थापनाने करोडो रुपये खर्चून त्यावर मात केली आणि भारतात ते यंत्र वापरणार्‍या एका उद्योजकाने केवळ ४०० रुपयांत त्यावर उपाय शोधला. भारतात बुद्धिमत्ता भरपूर आहे.

६. पिरॅमिडच्या तळाशी असलेल्या म्हणजेच हातावर पोट असणार्‍या कष्टकरी जनतेसाठी केवळ २ रुपयांत चहा पाकिटे, साबण आणि दैनंदिन गरजा भागवणार्‍या वस्तू विकण्याचे मॉडेल यशस्वी झाले; कारण या जनतेला अधिक पैसे देणे शक्य नसते आणि कमी गुंतवणुकीत त्यांना प्रतिदिन वस्तू घेता येत असल्याने भारतात क्रांती झाली आणि वस्तूंची विक्री वाढली.

७. एक महिला उद्योजिका विविध प्रकारचे लाडू विक्री करतात. मी त्यांना सांगितले की, अळिव लाडू फक्त बाळंतिणीने नव्हे; तर सर्वांनी खाल्ला तरी चालतो. मेथीचा लाडू कडवट असल्याने अधिक लोक खात नाहीत. लाडू हा गोलच असला पाहिजे का, त्याऐवजी लाडू करा आणि तो थापा आणि त्याला ‘एनर्जी बार’ असे नाव द्या. त्यांनी असे केले आणि २५ रुपयांचा लाडू ‘एनर्जी बार’ नावाने अधिक किमतीने विक्री होऊ लागला. अशा प्रकारे नवनवीन कल्पना आणल्या पाहिजेत. बाजाराचा अभ्यास, पॅकेजिंग, अभ्यास, ग्राहक बदलला असेल, तर नवी संधी शोधली पाहिजे.