Bengal Rath Mela : बंगालमध्ये ६२९ वर्षांच्या रथमेळ्याला तृणमूल सरकारने अनुमती नाकारली

  • केवळ रथयात्रेला दिली अनुमती

  • कायदा आणि सुव्यवस्थेचे दिले कारण

मालदा (बंगाल) – मुसलमानबहुल मालदा जिल्ह्यातील जलालपूर शहरात गेली ६२९ वर्षे आयोजित होणार्‍या रथमेळ्याला तृणमूल काँग्रेसने अनुमती नाकारली आहे. श्री महाप्रभू मंदिराजवळ हा मेळा आयोजित केला जातो, जो साधारण एक आठवडा चालतो. रथयात्रा हा त्याचाच एक भाग आहे. पोलिसांनी केवळ रथयात्रेसाठी अनुमती दिली आहे; परंतु मेळ्याला ती दिली नाही. ‘मेळ्यामुळे परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो’, असे पोलिसांचे म्हणणे आहे. गेल्या काही वर्षांत रथयात्रेच्या काळात हत्येसारखे अनेक गंभीर गुन्हे घडले आहेत. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने तृणमूल काँग्रेस सरकारच्या सूचनेनुसार मेळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

न्यायालयाकडे जाण्याचा आयोजकांचा निर्णय

६२९ वर्षांचा रथमेळा बंद करण्याच्या निर्णयाने आयोजकांनाही आश्चर्य वाटले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, हा मेळा केवळ धार्मिकच नाही, तर परिसरातील अर्थव्यवस्थेसाठीही फार महत्त्वाचा आहे. प्रत्येक जात आणि धर्म यांचे लोक त्यात सहभागी होतात. आयोजकांनी आता जिल्हा दंडाधिकारी आणि न्यायालय यांच्याकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे. रथयात्रा समितीचे सचिव गौतम मंडल म्हणाले की, हा मेळा बाबर आणि मोगल यांच्या भारतात येण्याच्या पूर्वीपासूनच होत आहे. केवळ मतपेढीच्या राजकारणामुळे तो थांबवला जात आहे.

तृणमूल काँग्रेसचे समर्थन, तर भाजपचा विरोध !

तृणमूल काँग्रेसचे राज्य सरचिटणीस कृष्णेंदु नारायण चौधरी यांनी पोलिसांच्या निर्णयाचे समर्थन केले आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न असल्याचे म्हटले. भाजपचे स्थानिक नेते अजय गांगुली यांनी आरोप केला की, या निर्णयावरून असे दिसून येते की, हा निर्णय पोलिसांनी घेतला आहे; परंतु त्यामागे तृणमूल काँग्रेस सरकार आहे. (केंद्रातील भाजप सरकारने तृणमूल काँग्रेस सरकार विसर्जित केले पाहिजे, अशी मागणी आता केली पाहिजे ! – संपादक)

संपादकीय भूमिका

  • तृणमूल काँग्रेस सरकारची मानसिकता पहाता त्याच्याकडून असा निर्णय घेतला जाणे, यात आश्चर्य ते काय ?
  • कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न इतक्या वर्षांत आला नाही, तो आताच कसा आला ? कायदा-सुव्यवस्था राखणे पोलिसांचेच कर्तव्य असतांना ते यात अपयशी ठरले आहेत, असेच यातून उघड होते !