उद्दिष्ट, सातत्य, वेळेच्या व्यवस्थापनातून यशस्वी उद्योजक बना ! – डॉ. रवींद्र प्रभुदेसाई, पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक

रत्नागिरीत कर्‍हाडे ब्राह्मण संघाच्या वतीने डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांचा सत्कार

डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांचा सत्कार करतांना रत्नागिरी कर्‍हाडे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर आणि सर्व संचालक

रत्नागिरी – समाजातले काही न्यून असेल, ते दूर करा. उद्दिष्ट समोर ठेवा, सातत्य ठेवा, वेळेचे व्यवस्थापन आणि त्यातून निकाल काय समोर येतो, हे पाहिले पाहिजे. अशा कृतीतूनच तुम्ही यशस्वी उद्योजक होऊ शकता, असा कानमंत्र पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र वामन प्रभुदेसाई यांनी दिला.
टिळक महाराष्ट्र विद्यापिठाने (पुणे) डॉक्टरेट पदवी प्राप्त झाल्याबद्दल श्री. प्रभुदेसाई यांचा सन्मान रत्नागिरी कर्‍हाडे ब्राह्मण सहकारी संघाच्या वतीने २२ जून या दिवशी येथील राणी लक्ष्मीबाई सभागृहात करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.

संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर, उपाध्यक्ष मानस देसाई, संचालक सुयोगा जठार, प्रतिभा प्रभुदेसाई, विवेक पुरोहित, उमेश आंबर्डेकर, अधिवक्त्या प्रिया लोवलेकर, चंद्रकांत हळबे, दिलीप ढवळे, सुहास ठाकुरदेसाई यांनी प्रभु श्रीरामाची मूर्ती, राणी लक्ष्मीबाईंची प्रतिमा, शाल, श्रीफळ देऊन डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांचा सत्कार केला. के.जी.एन्. सरस्वती फाऊंडेशनच्या वतीने चंद्रकांत हळबे, डॉ. शरद प्रभुदेसाई आणि अशोक घाटे यांनीही डॉ. प्रभुदेसाई यांचा सत्कार केला. कीर्तनसंध्या परिवाराच्या वतीने अवधूत जोशी आणि सहकार्‍यांनी डॉ. प्रभुदेसाई यांचा सन्मान केला.

 गुरूंच्याच आशीर्वादामुळे मला डॉक्टरेट मिळाली !

डॉ. रवींद्र प्रभुदेसाई पुढे म्हणाले की, पितांबरी उद्योग समूहाची वार्षिक १० कोटी रुपयांची उलाढाल झाली आणि एका कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी मराठी उद्योजकाची १०० कोटी रुपयांची उलाढाल आहे का ?, असा प्रश्न विचारला. त्या वेळी एकही हात वर आला नाही आणि मी सांगितले पुढच्या १० वर्षांत व्यवसाय वाढवतो. ५० कोटी रुपयांच्या वर व्यवसाय नेला; पण बाजारातून येणे बाकी राहू लागली. त्या वेळी सनातन संस्थेचे संस्थापक डॉ. जयंत बाळाजी आठवले (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) यांनी गुरुमार्ग दाखवला. त्यानंतर लक्ष्य ठेवून १०० कोटी रुपयांच्या उलाढाल केली. गुरूंच्याच आशीर्वादामुळे मला डॉक्टरेट मिळाली.
रत्नागिरी कर्‍हाडे ब्राह्मण संघ आणि के.जी.एन्. सरस्वती फाऊंडेशन या दोन्ही संस्थांचे काम चांगले चालू असून सांगत त्यांच्यासाठी प्रत्येकी २५ सहस्र रुपयांचे साहाय्य श्री. प्रभुदेसाई यांनी घोषित केले.

अध्यक्ष माधव हिर्लेकर यांनी रवींद्र प्रभुदेसाई यांच्या कार्याची माहिती दिली, तसेच ‘कर्‍हाडे ब्राह्मणांचा इतिहास’ या पुस्तकाविषयी मनोगत मांडले. रवींद्र प्रभुदेसाई यांच्या कार्याविषयी अधिवक्ता प्रशांत पाध्ये, डॉ. श्रीधर ठाकूर, प्रमोद कोनकर, ठाणे कर्‍हाडे संघाचे कार्यवाह संदीप कळके यांनी मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांच्या हस्ते ‘कर्‍हाडे ब्राह्मणांचा इतिहास’ (पाचवी आवृत्ती) या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकाचे लेखन वर्ष १९४७ मध्ये (कै.) विष्णु वासुदेव आठल्ये (शिपोशी) यांनी केले आहे. या पुस्तकाविषयी डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. प्रतिभा प्रभुदेसाई यांनी सूत्रसंचालन केले. अधिवक्त्या प्रिया लोवलेकर यांनी आभार मानले.