Estimates Committee Meet : अंदाज समितीच्या माध्यमातून देशात वित्त अनुशासन शक्य ! – ओम बिर्ला, अध्यक्ष, लोकसभा

संसदेच्या अंदाज समितीच्या अमृत महोत्सवानिमित्त देशातील सर्व राज्यांतील अंदाज समित्यांच्या सदस्यांची महाराष्ट्र विधानभवनात परिषद !

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला

मुंबई, २३ जून (वार्ता.) – सरकारकडून खर्च केलेला निधी योग्य प्रकारे वापरला गेला आहे ना ?, हे प्रत्यक्ष कार्यस्थळी जाऊन त्यांचे मूल्यांकन करण्याचे काम अंदाज समिती करते. धनाचा योग्य वापर आणि व्यवहारात पारदर्शकता, हे अंदाज समितीमुळेच शक्य होते. सरकारचा कारभार पारदर्शकतेने होण्यासाठी अंदाज समितीचे कार्य महत्त्वाचे आहे. अंदाज समितीच्या माध्यमातून देशात वित्त अनुशासन शक्य आहे, असे वक्तव्य लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केले.

संसदेतील अंदाज समितीच्या कार्यारंभाला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्राच्या विधानभवनामध्ये २३ आणि २४ जून या दिवशी एका परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या मार्गदर्शनाखाली ही परिषद होत आहे. या परिषदेला विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष अधिवक्ता राहुल नार्वेकर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, लोकसभेच्या अंदाज समितीचे प्रमुख डॉ. संजय जयस्वाल, महाराष्ट्र विधानमंडळाच्या अंदाज समितीचे प्रमुख अर्जुन खोतकर आदी उपस्थित होते. ‘अर्थसंकल्पीय अंदाजांचे पुनर्विलोकन आणि प्रभावी नियंत्रण, यांसाठी अंदाज समितीची भूमिका’ यावर या परिषदेमध्ये विचारमंथन होणार आहे.

सर्व राज्यांतील अंदाज समित्यांच्या सदस्यांची महाराष्ट्र विधानभवनात परिषद !

ओम बिर्ला पुढे म्हणाले, ‘‘ज्या अंदाज समितीने राज्याअंतर्गत प्रभावीपणे काम केले, त्यांच्या कार्यप्रणालीचा उपयोग अन्य राज्यांनीही करावा. येणार्‍या काळात अंदाज समितीच्या सदस्यांसाठी आम्ही प्रशिक्षण आयोजित करू.’’

विधीमंडळ समित्यांच्या ७०-७५ टक्के सूचनांचा शासनाकडून स्वीकार ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अर्थसंकल्पामध्ये एखाद्या कामाला निश्चित करण्यात आलेला निधी योग्य आहे ना ?, तसेच हा निधी योग्य पद्धतीने वापरला जात आहे ना ?, यांवर अंदाज समितीद्वारे नियंत्रण ठेवले जाते. विधीमंडळाच्या या विविध समित्या एकप्रकारे सरकारवर अंकुश ठेवण्याचे काम करतात. सरकार केवळ अधिवेशनापुरते नव्हे, तर वर्ष विधीमंडळाला बांधील आहे; कारण या समित्यांच्या माध्यमातून वर्षभर काम चालू असते. राज्यघटनेने निर्माण केलेली ही उत्तम व्यवस्था आहे. महाराष्ट्र विधीमंडळाच्या समित्यांनी मांडलेल्या ७०-७५ टक्के सूचना सरकारकडून स्वीकारल्या जातात.

जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या उक्तीप्रमाणे चांगल्या मार्गाने धन प्राप्त करून जनतेच्या कल्याणासाठी वापरावे ! – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्याच्या दृष्टीने विधीमंडळाच्या अंदाज समितीचे कार्य महत्त्वपूर्ण आहे. विधीमंडळाच्या विविध समित्यांनी घेतलेले चांगले निर्णय राज्याची अर्थव्यवस्था बळकट करतात. या समितीचा कारभार पारदर्शक असणे आवश्यक आहे. यामुळे विधीमंडळाचे कामकाज प्रभावशाली होते. विधीमंडळाच्या विविध समित्या या एकप्रकारे विधीमंडळच आहेच. संत तुकाराम महाराज यांनी म्हटले आहे. ‘जोडोनिया धन उत्तम व्यवहारे । उदास विचारे वेच करी’ या उक्तीप्रमाणे चांगल्या मार्गाने धन प्राप्त करून ते जनतेच्या कल्याणाकरता वापरायला हवे.
या परिषदेमध्ये राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अंदाज समित्यांचे प्रमुख आणि सदस्य, तसेच महाराष्ट्र विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य उपस्थित होते.