Pakistani Politicians Demand : ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार देण्याची मागणी मागे घ्या  !

पाकमधील नेत्यांची सरकारकडे मागणी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प व पाक सैन्याचे फील्ड मार्शल असीम मुनीर

इस्लामाबाद (पाकिस्तान) – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळावा, अशी मागणी पाक सैन्याचे फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी नुकतेच ट्रम्प यांची अमेरिकेत भेट घेतल्यानंतर केली होती. पाकचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री इशाक डार यांनी त्यांच्या स्वाक्षरीचे शिफारस पत्र नॉर्वेमधील नोबेल शांतता पुरस्कार समितीला पाठवले होते. आता अमेरिकेने इराणच्या अणू केंद्रावर आक्रमण केल्यामुळे ट्रम्प यांचे नाव नोबेलसाठी पाठवण्यावर पुनर्विचार करावा, अशी पाकमधील नेत्यांनी मागणी केली आहे. जमियत उलेमा-ए-इस्लामचे प्रमुख नेते मौलाना फजलुर रहमान यांनी सरकारकडे हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे.

१. रहमान यांनी त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्ता बैठकीत म्हटले की, ट्रम्प यांचा शांततेचा दावा खोटा निघाला. नोबेल पुरस्कारासाठी त्यांचे नाव परत मागे घ्यायला हवे. ट्रम्प यांनी पॅलेस्टाईन, सीरिया, लेबनॉन आणि इराण येथील इस्रायली आक्रमणांचे समर्थन केले आहे. मग ते शांततेचे पुरस्कर्ते कसे होऊ शकतात ?

२. माजी खासदार मुशाहिद हुसेन यांनी म्हटले की, ट्रम्प शांतता दूत राहिले नाहीत, तर असे नेते आहेत, ज्यांनी जाणुनबुजून युद्ध लादले आहे. त्यामुळे पाकिस्तानी सरकारने ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार मिळावा, या निर्णयाचा फेरविचार करावा.

संपादकीय भूमिका

पाककडे स्वतःचे असे कोणतेच धोरण नाही. इस्लामच्या नावाखाली एकीकडे भारतात आतंकवादी कारवाया करायच्या, तर दुसरीकडे अफगाणिस्तान, इराण आदी इस्लामी देशांच्या विरोधात उभे ठाकायचे. चीनमधील मुसलमानांवरील अत्याचारांवर मौन बाळगायचे, अशी पाकची नीती आहे, हे भारतातील पाकप्रेमी मुसलमानांना कधी लक्षात येणार ?