|
फोंडाघाट – सध्या महाराष्ट्र वीजवितरण आस्थापनाकडून फोंडाघाट पंचक्रोशीच्या आजूबाजूच्या गावांत वीजग्राहकांना विश्वासात न घेता जुने मीटर पालटून ‘स्मार्ट प्रीपेड मीटर’ बसवले जात आहेत. याला विरोध करत फोंडाघाट येथील नागरिकांनी एकत्र येत कार्यकारी अभियंता, बिजलीनगर, कणकवली आणि दुय्यम अभियंता, महाराष्ट्र राज्य वीजवितरण महामंडळ यांना अर्ज दिला आहे, तसेच जुने मीटर कायम ठेवावेत, या मागणीचे कार्यकारी अभियंत्यांना १५ जून या दिवशी दिलेले पत्र ग्रामपंचायतीने निदर्शनास आणून दिले आहे.
वीज ग्राहक ‘स्मार्ट प्रीपेड मीटर’ बसवण्याला विरोध असल्याचा अर्ज करत असतांनाही कार्यकारी अभियंता, कणकवली यांनी ग्रामपंचायतीला पत्र पाठवून मीटर पालटण्याचे कंत्राट ‘ए.एम्.आय.एस्.पी.’ आस्थापनाला दिल्याचे कळवले आहे. या पत्रामुळे वीज ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
जुने मीटर व्यवस्थित असतांना ग्राहकांना विश्वासात न घेता ‘स्मार्ट प्रीपेड मीटर’ बसवण्याचा महावितरणाचा अट्टहास का ? केवळ ठेकेदारांसाठी हा प्रपंच आहे का ? असे प्रश्न ग्राहकांकडून उपस्थित केले जात आहेत. सर्व वीजग्राहक पालकमंत्री नितेश राणे यांचे या प्रकरणाकडे लक्ष वेधणार आहेत.