दवर्ली येथे मराठी राजभाषा निर्धार मेळावा गोव्यातील पोर्तुगीजधार्जिणे लोक मराठीला करत आहेत विरोध ! – प्रा. सुभाष वेलिंगकर

प्रा. सुभाष वेलिंगकर

मडगाव, २२ जून (वार्ता.) – राज्यात अजूनही पोर्तुगीजधार्जिणे लोक अस्तित्वात आहेत आणि ते मराठीला विरोध करत आहेत. यासाठी आगामी २ वर्षांमध्ये मराठी मतपेढी बळकट करून मराठीला राजभाषेचा दर्जा मिळवून द्यावा, असे आवाहन मराठी राजभाषा निर्धार समितीचे राज्य निमंत्रक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी केले. दवर्ली येथील श्री दुर्गादेवीच्या मंदिर सभागृहात आयोजित केलेल्या मडगाव क्षेत्रासाठीच्या मराठी राजभाषा निर्धार मेळाव्यात प्रा. सुभाष वेलिंगकर बोलत होते. या वेळी व्यासपिठावर श्री. गो.रा. ढवळीकर आणि अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.

प्रा. सुभाष वेलिंगकर पुढे म्हणाले,

‘‘काही पोर्तुगीजधार्जिणे लोक अजूनही गोवा वेगळा प्रदेश म्हणत आहेत. तो एक स्वतंत्र देशच म्हणून ओळखला जावा; म्हणून काहींनी संयुक्त राष्ट्रांना पत्र लिहिले आहे. हेच लोक मराठी संस्कृतीला मारक ठरत आहेत. मराठी मतपेढी बळकट केल्यास मराठी राजभाषा करण्यास सरकारवर दबाव येणार आहे. राज्यात मराठी संस्कृती, मराठी वर्तमानपत्रे, धार्मिक विधी, आरती, पूजा, पत्रव्यवहार हे सर्व मराठीतूनच होत आहे, असे असूनही मराठी भाषेवर अन्याय होत आहे.’’

श्री. गो.रा. ढवळीकर म्हणाले,

‘‘मराठी संतांची भाषा असून ती एक समृद्ध भाषा आहे. कोकणी जरी काही लोकांमुळे राजभाषा झाली, तरीही ती कुठेच पत्रव्यवहारामध्ये वापरली जात नाही. आम्ही कोकणी भाषेला बोली भाषाच मानतो.’’ कार्यक्रमानंतर मराठीप्रेमींनी मराठी राजभाषा करण्यासाठी प्रतिज्ञा घेतली.

‘रोमी लिपी’ ही भारतीय लिपी नाही आणि तिला राजभाषेचा दर्जा देण्याची मागणी करणे चुकीचे

यानंतर पत्रकारांशी बोलतांना प्रा. सुभाष वेलिंगकर म्हणाले, ‘‘सासष्टी आणि दक्षिण गोव्यातील काही भागांत रोमी लिपीतील कोकणीला राजभाषा म्हणून स्थान मिळावे, यासाठी चळवळ चालू आहे. मुळात रोमी ही भारतीय लिपीच नाही आणि त्यामुळे ही मागणी करणेच चुकीचे आहे. आम्ही रोमी लिपीला कदापि राजभाषेचा दर्जा देण्यास मान्यता देणार नाही. मराठी भाषेमुळेच गोव्यात भारतीय संस्कृती टिकून आहे. त्यामुळे मराठी ही राजभाषा झालीच पाहिजे.’’