पणजी, २२ जून (वार्ता.) – युवकांमध्ये अमली पदार्थांचा वापर वाढत आहे. यामुळे केवळ कुटुंब आणि समाज उद्ध्वस्त होत नाही, तर संपूर्ण देशासाठी हा एक धोका बनला आहे. यावर आळा घातलाच पाहिजे. संपूर्ण मानवजातीसाठी हे धोकादायक आहे. अमली पदार्थांची समस्या पूर्णपणे नष्ट झाली पाहिजे, असे मत अमली पदार्थविरोधी पथकाच्या पोलीस अधीक्षक सुनिता सावंत यांनी मांडले आहे. गोवा पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने २२ जून या दिवशी ‘रन अगेन्स्ट ड्रग’ (अमली पदार्थांच्या विरोधात प्रचार करण्यासाठी धावणे) या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यामध्ये पोलीस महासंचालक आलोक कुमार आणि अन्य वरिष्ठ पोलीस अधिकारी यांची उपस्थिती होती. उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमात अमली पदार्थविरोधी पथकाच्या पोलीस अधीक्षक सुनिता सावंत बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, ‘‘अमली पदार्थांना विरोध करा. आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारा आणि सशक्त बना, असा संदेश देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन केले होते.’’
गोव्यात साडेपाच महिन्यांत ७३ कोटी ७५ लाख रुपयांचे अमली पदार्थ घेतले कह्यात
९८ जणांना घेतले कह्यात : कह्यात घेतलेल्यांमध्ये सर्वाधिक गोमंतकीय

पणजी – गोवा पोलिसांचे अमली पदार्थविरोधी पथक, गुन्हे अन्वेषण शाखा आणि राज्यातील इतर पोलीस या सर्वांनी १ जानेवारी २०२५ ते १५ जून २०२५ या साडेपाच महिन्यांच्या कालावधीत अमली पदार्थ व्यवसायासंबंधी एकूण ७८ गुन्हे नोंद केले आहेत, तर
९८ जणांना कह्यात घेतले आहे. त्यांच्याकडून ७३ कोटी ७५ लाख रुपये किमतीचे १४९ किलो ४०२ ग्रॅम अमली पदार्थ कह्यात घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे कह्यात घेतलेल्यांमध्ये सर्वाधिक २६.५३ टक्के गोमंतकीय नागरिकांचा समावेश आहे.
गतवर्षी वर्षभरात अमली पदार्थावरून १६२ गुन्हे नोंद झाले, तर १९० जणांना कह्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून ९ कोटी ९१ लाख रुपये किमतीचे विविध प्रकारचे अमली पदार्थ कह्यात घेण्यात आले. यंदा साडेपाच महिन्यांमधील कारवाई पहाता राज्यात अमली पदार्थांचा व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढल्याचे समोर येत आहे. यंदा साडेपाच महिन्यांमध्ये कह्यात घेतलेल्या ९८ जणांमध्ये २६ जण गोमंतकीय, ५७ परप्रांतीय आणि १५ विदेशी नागरिक आहेत. विदेशींमध्ये
३ स्विडीश, तर नायजेरिया, रशिया, नेपाळ आणि जर्मनी येथील प्रत्येकी २ नागरिकांचा समावेश आहे. याखेरीज घाना, जपान, इस्रायल आणि झिम्बाब्वे यांचा प्रत्येकी एक नागरिक सहभागी आहे.
अमली पदार्थ बाळगल्याच्या प्रकरणी कळंगुट येथे १ जण कह्यातपणजी – अमली पदार्थ बाळगल्याच्या प्रकरणी कळंगुट पोलिसांनी कांदोळी येथील रहिवासी विनय के. (वय ३३ वर्षे) याला कह्यात घेतले आहे आणि त्याच्याकडून ५५ सहस्र रुपये किमतीचा ५५० ग्रॅम गांजा कह्यात घेण्यात आला आहे. |