
पंढरपूर – आषाढी यात्रेच्या निमित्ताने लाखो भाविकांची तहान भागवण्यासाठी प्रतिदिन सुमारे ४ कोटी लिटर स्वच्छ आणि निर्जंतुक पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आषाढी वारीच्या निमित्ताने गतवर्षी २० लाखांहून अधिक वारकरी भाविकांनी उपस्थिती लावली होती. यंदाही हाच आकडा अपेक्षित धरून पाणीपुरवठा विभागाने नियोजन केले आहे. वारीपूर्वी पाणी साठवण्याच्या टाक्याची स्वच्छता आणि देखभाल दुरुस्तीची आवश्यक ती कामे पूर्ण केली आहेत. विद्युत मोटारींची आवश्यक ती काळजी घेण्यात आली आहे, अशी माहिती नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली.
मुख्याधिकारी म्हणाले, ‘‘अष्टमी ते पौर्णिमा या काळात मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्गावर असलेली भाविकांची गर्दी लक्षात घेऊन या परिसरात २ वेळा पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले आहे. भक्तीसागर, चंद्रभागा वाळवंट, पत्राशेड दर्शनबारी, गोपाळपूर रस्ता या परिसरात नळाद्वारे २४ घंटे पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. भाविकांचे टँकर भरून देण्यासाठी मनिषानगर पाणीपुरवठा केंद्र आणि भक्तसागर येथे भाविकांना पिण्याच्या पाण्याचे विनामूल्य टँकर भरुन देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.’’
पंढरपूर तालुक्यात येणार्या सर्व मार्गांवर आणि शहरात स्वागत मंडप, कमान घालण्यास प्रतिबंध !आषाढी यात्राकाळात येणार्या भाविकांची यात्रा सुलभ आणि सुरक्षितपणे पार पडावी यासाठी पंढरपूर तालुक्यात प्रवेश करणार्या सर्व मार्गांवर, तसेच शहराच्या हद्दीवर-शहरात स्वागत कमान घालण्यास, स्वागत मंडप घालण्यास प्रतिबंध करण्यात आले. याच समवेत पंढरपूर शहरात आणि तालुक्याच्या परिसरात होर्डिंग, फलक, फ्लेक्स लावण्यास १५ जुलैपर्यंत प्रतिबंध करण्यात आला असून या संदर्भातील आदेश उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे यांनी पारीत केला आहे. |