वारीला प्रारंभ १८ जूनला, तर निविदा १९ जून या दिवशी काढली !

पुणे, २२ जून (वार्ता.) – आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान १८ जून या दिवशी आणि १९ जून या दिवशी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीचे प्रस्थान मोठ्या उत्साहामध्ये पार पडले. या दोन्ही पालख्यांच्या मार्गांवर सरकारकडून माहितीपटांचे सादरीकरण करणे, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून वारकर्यांमध्ये जनजागृती करणे, ठिकठिकाणी एल्.ई.डी. स्क्रीन लावणे, अभियानाविषयी फलक लावणे आदी कामांसाठीची निविदा १९ जून या दिवशी काढण्यात आली. त्यासाठी १५ कोटी रुपयांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्यक्षात आषाढी वारी चालू झालेली असतांना ही निविदा कुणाच्या लाभासाठी? कुणाच्या प्रसिद्धीसाठी काढण्यात आली आहे ? असा प्रश्न जनतेला पडला आहे.
आषाढी एकादशीनिमित्त जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची पालखी देहू ते पंढरपूर आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आळंदी ते पंढरपूर असा प्रवास करते. या पालखी मार्गांवर दोन्ही पालख्यांमध्ये सहभागी होणार्या वारकर्यांना उद्भवणार्या विविध नैसर्गिक, तसेच मानवनिर्मित्त आपत्तींच्या संदर्भात चित्ररथ, एल्.ई.डी. बसवलेले वाहन, पथनाट्य, लोककला, भ्रमणभाष प्रदर्शन, ‘सेल्फी पॉईंट’ आणि इतर अनुषंगिक प्रकाशनांच्या माध्यमांतून वारकर्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी ही निविदा काढण्यात आली. आपत्ती व्यवस्थापनाच्या विज्ञापनासाठी ३ कोटी ९९ लाख ८५ सहस्र ५०० रुपये, तर रोजगार हमी योजनाच्या (रोहयो) प्रसिद्धीसाठी १० कोटी ६० लाख रुपये व्यय करण्यात येणार आहेत.

सरकारला वारीनिमित्ताने विज्ञापन करायचे होते, तर त्याची निविदा, नियोजन हे वारीपूर्वीच करणे अपेक्षित होते. त्याची सिद्धताही पूर्वीच व्हायला हवी होती. वारीला प्रारंभ होण्यापूर्वीच विज्ञापने ही दोन्ही पालख्यांच्या मार्गांवर लागणे अपेक्षित होते. त्या माध्यमातून सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोचल्या असत्या; परंतु असे होतांना दिसत नाही. केवळ ठेकेदार आणि विज्ञापनधारकांच्या लाभासाठी ही निविदा काढली गेली का ? असा प्रश्न उपस्थित होतो.
संपादकीय भूमिकाहा प्रशासनाचा नियोजनशून्य कारभार ! ही सामान्य जनतेच्या डोळ्यात धूळफेक, दिखाऊपणा आणि करदात्यांच्या पैशांची तर उधळपट्टी नाही ना ? |