कोल्हापूरची हद्दवाढ आवश्यक : ८ गावांना समाविष्ट करण्यासाठी पत्र ! – राजेश क्षीरसागर, आमदार, शिवसेना

कोल्हापूर, २२ जून (वार्ता.) – वर्ष १९७२ पासून कोल्हापूरची हद्दवाढ झालेली नाही. विकासासाठी हद्दवाढ आवश्यक असून त्यासाठी मुख्यमंत्री अन् दोन्ही उपमुख्यमंत्री सकारात्मक आहेत. त्यामुळे पहिल्या टप्प्यात शहरालगतच्या ‘उंचगाव, सरनोबतवाडी, मोरेवाडी, पाचगाव, कळंबा तर्फ ठाणे, नवे बालिंगा, नवे पाडळी, पिरवाडी या ८ गावांचा समावेश करण्याची प्रक्रिया चालू करावी’, असे पत्र महापालिकेच्या आयुक्तांना दिले आहे. हद्दवाढ करण्याच्या मागे माझी स्वार्थी भूमिका नाही, असे विधान राज्य नियोजन महामंडळाचे कार्याध्यक्ष, तसेच शिवसेनेचे आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांनी केले. ते हद्दवाढीच्या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

श्री. राजेश क्षीरसागर

ते म्हणाले की, काँग्रेसमुळे शहराची हद्दवाढ झाली नाही. यासाठी मंत्रालय स्तरावर बैठका चालू असून मुख्यमंत्र्यांनीही पुढील प्रक्रियेस मान्यता दिली आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींना त्यांची भूमिका घोषित करावीच लागेल.

आयुक्त आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडील ठरावानंतर ते प्रस्ताव सादर करतील. राज्यशासन ८ गावांच्या हद्दवाढीच्या संदर्भात निवडणूक आयोगाशी चर्चा करतील. कदाचित महापालिका निवडणुकीच्या पूर्वी ‘नोटिफिकेशन’ प्रसिद्ध होऊ शकते. यानंतर ही गावे कोल्हापूर महापालिकेत समाविष्ट होण्याची पुढील प्रक्रिया चालू होईल.