माजी खासदार जलील यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती कुठून आली ? – वंचित बहुजन आघाडी

मंत्री संजय शिरसाट व इम्तियाज जलील

छत्रपती संभाजीनगर – ‘एम्.आय.एम्.’चे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी नुकतेच राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्यावर मालमत्तेसंबंधीचे गंभीर आरोप केले होते; पण आता वंचित बहुजन आघाडीने जलील यांच्यावरच कोट्यवधी रुपयांची मालमत्ता कमावल्याचा आरोप केला आहे. ‘इम्तियाज जलील ५ वर्षे खासदार आणि ५ वर्षे आमदार होते. या १० वर्षांत त्यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची मालमत्ता कोठून आली ?’, असा प्रश्न वंचितचे स्थानिक पदाधिकारी अफसर खान यांनी उपस्थित केला आहे.

अफसर खान म्हणाले की,

१. माजी खासदार इम्तियाज जलील यांनी स्वत:च्या पत्नीच्या नावाने खुलताबाद येथे १ कोटी रुपयांची मालमत्ता घेतली आहे. ते पूर्वी रहात असलेल्या ‘मन्नत क्रमांक एक’ हे घर २ कोटी रुपयांचे होते; पण त्यांनी ते केवळ ९५ लाख रुपयांत खरेदी करून या घरावर २ कोटी रुपये खर्च केले.

२. याशिवाय त्यांनी ते सध्या रहात असलेल्या ‘मन्नत टू’ बंगल्यावरही कोट्यवधी रुपयांचा खर्च केला आहे.

३. इम्तियाज जलील अनेकांना लुबाडतात. लोकांना भीती घालतात. त्यांना १ लाख रुपयांचे वेतन मिळते. त्यांनी सिडको प्रशासनावर दबाव टाकून हे घर घेतले होते.

४. अवघे १ लाख रुपये वेतन असणार्‍या जलील यांच्याकडे ३ वर्षांत ३ कोटी रुपये कुठून आले ? त्यांच्या घराला केवळ ४ सहस्र रुपयांचा कर लागतो; पण त्यांना त्याहून अधिक कर लागला पाहिजे. त्यांच्या विविध विकासकामांची चौकशी करावी. (प्रशासनाने चौकशी करून खुलासा करणे आवश्यक ! – संपादक)

जलील यांच्या विरोधात मंत्री संजय शिरसाट यांच्याकडून न्यायालयात फौजदारी दावा प्रविष्ट !

मंत्री संजय शिरसाट यांनी इम्तियाज जलील यांच्या विरोधात ‘शेंद्रा औद्योगिक भूखंडा’संबंधीच्या आरोपाप्रकरणी मुख्य न्यायदंडाधिकार्‍यांच्या न्यायालयात फौजदारी दावा प्रविष्ट केला आहे. त्यावर २४ जून या दिवशी सुनावणी होणार आहे. शिरसाट यांनी म्हटले की, इम्तियाज जलील यांनी ५ जून या दिवशी पत्रकार परिषदेत शिरसाट यांनी मद्य कारखान्यासाठी मुलगा सिद्धांत यांच्या नावे शेंद्रा औद्योगिक वसाहतीमधील भूखंड घेतला आहे, तसेच सत्तेचा अपवापर करत आरक्षण पालटून त्यांना हा भूखंड घेतल्याचा आरोप केला. याविषयीच्या बातम्या प्रसारमाध्यमांत प्रकाशित झाल्या आहेत. वास्तविक या भूखंडाच्या व्यवहाराच्या संदर्भात मी कोणताही पत्रव्यवहार केला नाही. एवढेच नव्हे, तर अधिकार्‍यांना दूरभाषही केले नाहीत. जलील यांच्या आरोपांमुळे माझी प्रतिमा जनमानसात मलीन झाली.