प्रसूतीकळा येणार्‍या महिलेला ताटकळत ठेवणार्‍या मद्यधुंद आधुनिक वैद्याला चोप !

नाशिक येथील नांदगाव ग्रामीण रुग्णालयातील धक्कादायक प्रकार !

नाशिक – जिल्ह्यातील नांदगाव ग्रामीण रुग्णालयातील मद्यधुंद अवस्थेत असलेल्या आधुनिक वैद्याने प्रसूतीसाठी भरती झालेल्या महिलेला ताटकळत ठेवले. तिला प्रसूतीकळा येत असतांनाही निष्काळजीपणा केल्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी आधुनिक वैद्याला चोप दिला. आधुनिक वैद्य मद्यधुंद अवस्थेत असल्याने महिलेला प्रसूतीवेदना चालू होऊनही उपचार मिळाले नाहीत. या प्रकरणाची गंभीर नोंद घेत सिव्हिल सर्जन डॉ. चारुदत्त शिंदे यांनी मद्यधुंद आधुनिक वैद्य आणि संबंधित कर्मचारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.

नांदगाव ग्रामीण रुग्णालयातील अनागोंदी कारभार !

नांदगाव ग्रामीण रुग्णालय

रुग्णालयात दाखले मिळवण्यासाठी आधुनिक वैद्य रुग्णांकडून पैसे घेतात, शवविच्छेदनासाठी नातेवाइकांकडून १ सहस्र रुपये उकळले जातात, आधुनिक वैद्य आणि कर्मचारी यांचे रुग्णांशी असभ्य वर्तन असते, तसेच उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. सामान्य प्रसूती शक्य असतांनाही सिझेरियन करण्याचा समुपदेश देण्यात येतो. रुग्णालयात उपचाराऐवजी रुग्णांना बाहेरच्या रुग्णालयात पाठवले जाते. दुपारी १ वाजल्यानंतर रुग्णालयात आधुनिक वैद्य अनुपस्थित असतात. शासकीय रुग्णालय असूनही रुग्णांना खासगी औषधालयातून औषधे आणायला सांगितले जाते. (असे प्रकार होत असतांना अधिष्ठाता झोपलेले आहेत का ? त्यांना हा अनागोंदी प्रकार दिसत नाही का ? आधुनिक वैद्य आणि कर्मचारी यांच्या असभ्य वागण्याकडे दुर्लक्ष करणार्‍या अधिष्ठात्यांवर प्रथम कारवाई करायला हवी ! – संपादक)

संपादकीय भूमिका

मद्यधुंद अवस्थेत नोकरीवर येणार्‍या आधुनिक वैद्यांवर रुग्णालय प्रशासनाचा अंकुश नसणे संतापजनक !