पुणे – आषाढी एकादशीला लाखो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला येतात. भाविकांच्या स्वागतासाठी जय्यत सिद्धता करण्यात आली आहे. ‘व्हीआयपी’दर्शन सुविधा पूर्वीच बंद करण्यात आली असून महत्त्वाचे सेवेकरी, मठकरी, चोपदार, टाळकरी यांना दर्शनासाठी प्राधान्य देण्यात येणार असल्याचे ‘विठ्ठल-रुक्मिणी संस्थान’चे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ औसेकर यांनी सांगितले. जागतिक योग दिनानिमित्त ‘वारकरी भक्तीयोग’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी पंढरपूर येथील अन्य सिद्धतेविषयी विस्तृत माहिती दिली.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पांडुरंगाची शासकीय पूजा होणार आहे. वारकर्यांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा कर्मचारी, कमांडो पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. दर्शन रांगेतील वारकर्यांसाठी विविध सुविधा देणार असून वारकर्यांच्या मनोरंजनाचीही व्यवस्था करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. विठ्ठल मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.