तीर्थक्षेत्रे मद्यमांसमुक्त होण्यासाठी योग्य उपाययोजना करा !

४०० हून अधिक वारकर्‍यांसह हिंदु जनजागृती समितीची मागणी

भोर (पुणे), २२ जून (वार्ता.) – श्री रायरेश्वर धर्मादाय संस्था आयोजित पायी दिंडी आणि पालखी सोहळा ‘श्री रायरेश्वर ते पंढरपूर’ गेली ४७ वर्षांपासूनची परंपरा सांभाळत यंदाच्या वर्षीही २१ जून या दिवशी पालखीचे रायरेश्वर येथून प्रस्थान झाले. ही दिंडी पुढे शिवतीर्थ, चौपाटी भोर येथून पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. या प्रसंगी ४०० हून अधिक वारकरी उपस्थित होते. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे श्री. श्रीकांत बोराटे यांनी ‘वारकर्‍यांसमक्ष तीर्थक्षेत्रे मद्यमांस मुक्त होण्यासाठी सरकारने योग्य उपाययोजना करावी’, अशी मागणी केली. त्याला उपस्थित वारकर्‍यांनी अनुमोदन दिले. ‘आळंदी येथील इंद्रायणी नदी तीरावरील प्रस्तावित पशूवधगृह रहित करावे, नास्तिकवादी संघटनांकडून वारीमध्ये हिंदु धर्माविषयी केल्या जाणार्‍या अपप्रचाराला सरकारने प्रतिबंध करावा आणि ईशनिंदाविरोधी कायदा करावा’, अशा मागण्याही समस्त वारकरी संप्रदाय आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने करण्यात आल्या. दिंडीप्रमुख ह.भ.प. नामदेव महाराज किंद्रे यांनी समितीच्या कार्याचे कौतुक करत या मागण्यांसाठी पाठिंबा दर्शवला.