आज छत्रपती संभाजीनगर येथे १५० हून अधिक अतिक्रमणे हटवण्यात येणार !

मालमत्ताधारकांना नोटिसा !

छत्रपती संभाजीनगर – जालना रस्त्यावरील मुकुंदवाडी येथे २२९ अतिक्रमणे काढल्यानंतर महापालिकेने रहिवासी मालमत्ताधारकांना २ दिवसांचा वेळ दिला आहे. त्याविषयी २१ जून या दिवशी घोषणा करून अतिक्रमणे काढून घेण्याचे निर्देश दिले आहेत; मात्र स्थानिक व्यापार्‍यांनी कारवाईला विरोध दर्शवला आहे, तथापि २० जून या दिवशी झालेल्या हानीच्या पार्श्वभूमीवर नागरिक आणि व्यापारी यांनी स्वतःहून अतिक्रमणे काढून घेण्यास प्रारंभ केला आहे. २३ जूनच्या सकाळपासून अतिक्रमणे काढण्यास प्रारंभ होईल. १५० हून अधिक अतिक्रमणे हटवण्यात येणार आहेत. अतिक्रमणे काढल्यानंतर लगेचच सर्व्हिस रस्त्याचे काम चालू करण्यात येणार आहे.

बीड बायपास रस्त्यावर आखणी करून खांब लावण्यात आले आहेत. त्याप्रमाणे जालना रस्त्यावरही खांब लावण्यात येणार आहेत. २० जूनला कारवाईपूर्वी दुकानातील सामान काढण्यासाठी महापालिकेने वेळ दिला नाही. यामुळे कारवाईच्या वेळी दुकानांखाली सामान दबून मोठी हानी झाली होती. २१ जूनला दिवसभर हे दबलेले सामान बाहेर काढणे चालू होते. पत्रे, लोखंडी अँगल जमा करून भंगारमध्ये विकण्यासाठी दुकानदारांची धडपड चालू होती.