प्रबोधनपर भित्तीपत्रके लावतांना भविष्यात भित्तीपत्रकांवरील देवतांच्या चित्रांचा अनादर होणार नाही, याची दक्षता घ्या !

हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना सूचना

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दीपावली इत्यादी उत्सवांत जनप्रबोधनासाठी मोहिमा राबवतांना विविध भित्तीपत्रके सार्वजनिक ठिकाणी लावण्यात येतात. हिंदु धर्मजागृती सभांच्या प्रसारासाठीही भित्तीपत्रकांचा उपयोग केला जातो. या भित्तीपत्रकांचा जनप्रबोधनासाठी मोठा लाभ होतो; मात्र काही ठिकाणी ही भित्तीपत्रके रस्त्यावर पडलेली आढळली. या भित्तीपत्रकांवर असलेल्या देवतांची चित्रे लोकांच्या पायदळी आली. त्यामुळे येथून पुढे देवतांच्या चित्रांचा असा अनादर होऊ नये, यासाठी भित्तीपत्रकांचे ठिकाण निवडण्यापासूनच सर्वतोपरी काळजी घ्यावी. कोणीही भित्तीपत्रक फाडू शकणार नाही, असे ठिकाण निवडावे. भित्तीपत्रक लावतांना ते अधिक काळ भिंतीला चिकटून राहील, अशा प्रकारे त्याला चांगल्या गुणवत्तेची खळ किंवा तत्सम पदार्थ लावावा, असे समितीच्या वतीने कळवण्यात आले आहे.