‘टोकन दर्शन’ संख्येत वाढ करण्याचा निर्णय !

पंढरपूर – आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर ‘श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समिती’ने भाविकांच्या मागणीनुसार आणि सद्यःस्थितीचा विचार करून टोकन आधारित दर्शन संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रत्येक घंट्याला दिल्या जाणार्‍या टोकन संख्येत १०० ने वाढ करतांना भाविकांना अधिक सुलभतेने आणि अल्प वेळेत दर्शन घेता यावे, हा हेतू आहे. ६ स्लॉटमध्ये प्रत्येकी १०० टोकन, अशा एकूण ६०० टोकन पासांची वाढ करण्यात येणार आहे. २१ ते २६ जूनपर्यंत दर्शनासाठी वेळ, सुरक्षा आणि भाविकांच्या सोयीचा विचार करून ही सुधारणा करण्यात येत आहे, अशी माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

सध्या चालू असलेल्या टोकन दर्शन व्यवस्थेला भाविकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून दर्शनासाठी व्यवस्थित रांगा, वेगवान गतीने होत असलेले संचलन आणि सुरळीत यंत्रणेमुळे अधिक भाविकांना ही सुविधा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता जाणवत होती. भाविकांनी अधिकृत टोकन नोंदणी ऑनलाईन प्रणालीद्वारेच करावी. ही व्यवस्था भाविकांच्या सुविधेसाठी असून यामधून अधिकाधिक भाविकांना श्री विठ्ठलाचे दर्शन घेता येईल. – राजेंद्र शेळके, कार्यकारी अधिकारी