शहरात रहदारी सुरळीत करण्यासाठी महत्त्वपूर्ण उपाययोजना हाती घ्या ! – अमोल येडगे, जिल्हाधिकारी

पर्यटक, प्रवासी बस यांच्यासह व्यावसायिकांच्या वाहनतळ व्यवस्थेवर भर

अमोल येडगे, जिल्हाधिकारी

कोल्हापूर – कोल्हापूर शहरात वाढत्या वाहतुकीच्या समस्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी अतिक्रमण हटवणे, नवीन वाहनतळांची सोय करणे, झेब्रा क्रॉसिंग, विविध दिशादर्शक फलक, अशा विविध उपाययोजना तातडीने राबवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी संबंधित विभागांना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत त्यांनी शहरात रहदारी सुरळीत करण्यासाठी महत्त्वपूर्ण उपाययोजना हाती घेण्याचे निर्देशही या वेळी दिले.

शहरातील प्रमुख रस्त्यांवरील अनधिकृत फलक,  दुकानांपुढील अतिक्रमण तात्काळ काढावे. वाहतूक दिवे असलेल्या चौकांवर दिशादर्शक आणि माहिती फलक लावावेत. शहरातील श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सुट्टीच्या काळात मेन राजाराम हायस्कूल, पेटाळा मैदान, प्रायव्हेट हायस्कूल मैदान आणि खराडे महाविद्यालय या ठिकाणी ‘पैसे देऊन वाहनतळाची सुविधा’ या तत्त्वावर खासगी व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. वाहतुकीस अडथळा ठरणारे इलेक्ट्रिक खांब आणि रोहित्र तातडीने स्थलांतरित करावेत यांसह अन्य सूचना जिल्हाधिकार्‍यांनी दिल्या.

शाळा सुटण्याच्या वेळेत त्या भागातील गर्दी टाळण्यासाठी नियोजन करावे. दाभोळकर चौक ते ताराराणी चौक या मार्गावर खासगी आरामदायी गाड्या प्रवाशांना घेऊन जाण्यासाठी थांबतात. त्यामुळे सायंकाळच्या वेळेत वाहतूक कोंडी होते. या खासगी गाड्यांसाठी ताराराणी पुतळ्यानजीक असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ थांबण्याची सोय करावी. ही सर्व उपाययोजना प्रभावीपणे राबवल्यास शहरातील वाहतूक व्यवस्थेत सुसूत्रता येईल, असेही ते म्हणाले. याविषयी पुढील ८ दिवसांत कार्यवाही करून अहवाल सादर करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकार्‍यांनी केल्या.

संपादकीय भूमिका

जिल्हाधिकार्‍यांना अशी बैठक घेण्याची वेळ का येते ? जनतेच्या कररूपातून गलेलठ्ठ वेतन घेणारे विविध विभागांचे प्रशासकीय अधिकारी मग नेमके काय काम करतात ?