ज्ञानोबा-तुकाराम यांच्या गजरात मानाच्या पालख्यांसह लाखो वारकरी पुणे शहरात पोचले !

  • ‘सनातन प्रभात’चे वारी वृत्तांकन…

  • हाती भगवा अखंड धरू, मुखी ‘विठ्ठल-विठ्ठल’ म्हणू !

  • ऊन-पावसात लाखो वारकर्‍यांचे पंढरपुराकडे मार्गक्रमण !

आळंदीकडून पुणे येथे निघालेला संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा रथ

पुणे – ‘ज्ञानोबा-तुकाराम’, ‘राम कृष्ण हरि’, ‘विठ्ठल-विठ्ठल’ असा अखंड नामगजर करत ऊन-पावसात लाखो वारकर्‍यांनी पंढरपूरकडे मार्गक्रमण केले. देहू येथून निघालेली जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची पालखी, तर आळंदीहून निघालेली संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांची पालखी, या दोन्ही मानाच्या पालख्या आणि त्यांच्या समवेत असलेल्या लाखो वारकर्‍यांचा भक्तीसागर २० जून या दिवशी सायंकाळी पुणे येथे पोचला. २० जूनची रात्र आणि २१ जूनचा दिवस अन् रात्र पुणे येथे वास्तव्य करून या दोन्ही मानाच्या पालख्या २२ जून या दिवशी पहाटे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार आहेत.

श्री संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीने २० जून या दिवशी दुपारी संगमवाडी येथे विसावा घेतला आणि सायंकाळी ज्ञानोबांची पालखी पुणे शहरातील भवानी पेठ येथे पोचली. श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीने २० जून या दिवशी दापोडी येथे विसावा घेऊन सायंकाळी पुणे येथील नाना पेठमधील श्री निवडुंगा विठ्ठल मंदिर येथे निवासाला आली. या दोन्ही मानाच्या पालख्या २१ जूनच्या रात्रीही याच ठिकाणी निवास करणार आहेत.

अनेक किलोमीटरच्या प्रवासानंतरही वारकर्‍यांमध्ये आनंद आणि समाधन !

वारीमध्ये काठी टेकत चालणारे वृद्ध, डोक्यावर ओझे घेऊन चालणारे वारकरी, थकल्यावर खांद्यावर बसलेली मुले, तसेच मध्ये-मध्ये येणारा पाऊस आणि उन्हाचा तडाखा, अशा प्रकारे अनेक किलोमीटरचा प्रवास करूनही वारकर्‍यांमध्ये उत्साह अखंड होता. वारकर्‍यांच्या मुखावर वारीचा आनंद आणि समाधान दिसून येत होते.

टाळ-मृदंगासंगे हरिनामाचा गजर !

हाती टाळ-गळ्यात मृदंग धारण करत आणि मुखी श्री विठ्ठलाचे भजन करत वारकर्‍यांची शेकडो पथके संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली अन् जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या दिंड्यांमध्ये सहभागी झाली होती. प्रत्येक पथकाच्या प्रारंभी काही वारकरी हातात भगवा ध्वज धरून पुढे होते. त्यांच्या मागे तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन सुहासिनी होत्या. अनेक दिंड्यांमध्ये मृदंगासमवेत वीणा-चिपळ्या यांसह वारकरी पारंपरिक भजन करत श्री विठ्ठलाच्या नामाचा गजर करत मार्गक्रमण करत होते.

वारीतील ठळक घडामोडी !

१. दिंड्यांसमवेत असलेल्या वारकर्‍यांसमवेत त्यांचे साहित्य ठेवण्यासाठी ट्रक किंवा टेंपो आदी गाड्या होत्या; मात्र वाहनाची व्यवस्था नसलेले अनेक वारकरी डोक्यावर साहित्य घेऊन मार्गक्रमण करत होते.

२. प्रत्येक वारकर्‍याच्या कपाळाला गंध, तर अनेक वारकर्‍यांनी डोक्यावर टोपी, वारकरी पगडी धारण केली होती.

३. काही वारकर्‍यांनी भारतीय सैन्याने पाकिस्तानला प्रत्युत्तर दिलेल्या ‘सिंदूर’ मोहिमेचे नाव असलेल्या टोप्या, तर काहींनी लोकप्रतिनिधींच्या नावांच्या टोप्या घातल्या होत्या.

४. वारीमध्ये दर काही अंतरावर विविध लोकप्रतिनिधी, स्थानिक सेवाभावी मंडळे, वारकरी यांच्याकडून पाणी, केळी, बिस्किटे, न्याहारी, भोजन यांचे वाटप करण्यात येत होते.

५. वारीमार्गावरील अनेक घरांत प्रसाधनगृहाचा उपयोग वारीतील महिलांना उपलब्ध करून देण्यात येत होता.

६. वारीमध्ये काही सेवेकरी मंडळींद्वारे केशकर्तनाची सुविधा विनामूल्य देण्यात येत होती.