उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे बांदा शहर प्रमुख आणि ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर यांचा आरोप

सावंतवाडी – तालुक्यातील तेरेखोल नदीत गाळ काढण्याच्या नावाखाली वाळू उपसण्यात आली. त्यामुळेच पहिल्या पावसात बांदा शहरात पूरस्थिती निर्माण होऊन आळवाडी कट्टा कॉर्नर रस्ता पाण्याखाली गेला. याला पूर्णपणे प्रशासन उत्तरदायी आहे, असा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे बांदा शहर प्रमुख आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर यांनी केला आहे.
‘तेरेखोल नदीपात्रात गाळ उपसा करण्याचे काम जिल्हा प्रशासनाने केले होते; मात्र गाळ काढण्याच्या नावाखाली केवळ आर्थिक लाभ लाटण्यासाठी वाळूचा बेसुमार उपसा करण्यात आला. पाऊस तोंडावर आला असतांना नदीतून काढलेले गाळाचे ढीग त्याच ठिकाणी ठेवण्यात आले. याकडे प्रशासनाने जाणूनबुजून दुर्लक्ष केले. गाळ काढण्याचे काम पारदर्शकपणे करण्यात आले असते, तर बांदा शहरात पूरस्थिती उद्भवलीच नसती. २ दिवसांपूर्वी झालेल्या पहिल्याच पावसात शहरातील आळवाडी कट्टा कॉर्नर रस्ता पाण्याखाली गेला होता. जर गाळ पुरेशा प्रमाणात काढला गेला होता, तर पूरस्थिती का निर्माण झाली ? याचे उत्तर प्रशासनाने जनतेला द्यावे’, अशी मागणी साईप्रसाद काणेकर यांनी केली आहे.
संपादकीय भूमिकानदीतून गाळ काढण्याची प्रक्रिया योग्यरित्या होत आहे ना ? हेही आता जनतेनेच पहायचे असेल, तर प्रशासन काय कामाचे ? |