निधनवार्ता

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करणारे साधक धैवत वाघमारे (वय ४५ वर्षे) यांचे १७.६.२०२५ च्या रात्री आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांची आई श्रीमती अलका वाघमारे, मोठी बहीण श्रीमती धनश्री देशपांडे, भाची (बहिणीची मुलगी) कु. सायली देशपांडे, भाचा (बहिणीचा मुलगा) कु. श्रीनिवास देशपांडे, असा परिवार आहे. हे सर्व जण सनातनच्या रामनाथी आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करतात. ‘दिवंगत धैवत वाघमारे यांना सद्गती मिळो’, अशी सनातन परिवाराकडून भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !
तीव्र आध्यात्मिक त्रास असणार्यांसाठी साधना करण्यासाठीचा आदर्श असणारे धैवत वाघमारे !

‘श्री. धैवत वाघमारे यांचे अकस्मात् निधन झाले. श्री. धैवत वर्ष १९९९ पासून पूर्णवेळ साधना करू लागला. वर्ष २००३ पासून त्याला वाईट शक्तींचा तीव्र त्रास होऊ लागला. त्या त्रासाची तीव्रता इतकी तीव्र होती की, अनेक वेळा तो त्रास त्याच्या जिवावर बेतला होता; परंतु त्याची साधनेची तीव्र तळमळ आणि त्यामुळे त्याच्या पाठीशी असणारी ईश्वरी कृपा यांमुळे तो त्या संकटांमधून वाचला. त्याच्यामधील क्षात्रवृत्तीमुळेच तो तीव्र आध्यात्मिक त्रासावर मात करू शकत होता. अनेक वर्षे त्याने माझ्याबरोबर ग्रंथांसाठी लिखाणाच्या संकलनाचीही सेवा केली. संगणकाची दुरुस्ती करणे असो वा लिखाणाचे संकलन करणे असो, तो सर्वच सेवा चांगल्या प्रकारे करत होता.
धैवतने त्याच्या साधनेच्या २५ वर्षांच्या काळात ‘तीव्र आध्यात्मिक त्रास असूनही साधना कशी करू शकतो ?’, याचा एक आदर्श निर्माण करून ठेवला आहे.
त्याच्यातील साधकत्त्वामुळे त्याची आध्यात्मिक प्रगती चांगल्या प्रकारे होत आहे आणि यापुढेही होईल, याची मला निश्चिती आहे.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले