Pandharpur Wari 2025 : टाळ-मृदुंगाच्या गजरात जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरीकडे प्रस्थान !

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पादुका पूजन

जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा हा ३४० वा पालखी प्रस्थान सोहळा !

देहूगाव (जिल्हा पुणे) : जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीने १८ जूनच्या दुपारी अडीच वाजता सहस्रो वारकर्‍यांच्या उपस्थितीत आषाढी वारीसाठी देहू गावापासून पंढरीच्या दिशेने प्रस्थान केले. जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा यंदाचा हा ३४० वा पालखी प्रस्थान सोहळा आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे पूजन झाले. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित होते. येथील मुख्य मंदिराजवळील शिळा मंदिराच्या समोर वारकर्‍यांनी फुगडी खेळण्याचा आनंद लुटला.

या मंगलप्रसंगी टाळ-मृदुंगाचा गजर, तुकोबांचे नामस्मरण केले जात होते. यंदा वारीत पालखी रथाच्या पुढे २७ आणि रथाच्या मागे ३७० दिंड्या सहभागी होणार आहेत.

मुक्काम इनामदार वाड्यात !

श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा पहिला मुक्काम असलेला देहूगावातील इनामदार वाडा !
(चित्र सौजन्य : लोकमत)

प्रमुख दिंड्यांच्या उपस्थितीत हरिनामाचा गजर करत वारकरी भाविक भक्तांसह सायंकाळी ५ वाजता पालखीने मंदिराची प्रदक्षिणा घालून मुख्य मंदिरातून प्रस्थान केले. सायंकाळी ६.३० वाजता पालखी प्रस्थान सोहळा जगद्गुरु संत तुकोबारायांच्या आजोळी म्हणजे इनामदारसाहेब वाड्यात पहिल्या मुक्कामासाठी विसावेल. त्या ठिकाणी आरती होऊन रात्री देहूकर महाराजांचे कीर्तन, हरिनामाचा जागर असे धार्मिक कार्यक्रम हाेतील.