UP Muslim Youth Ghar Wapsi : उत्तरप्रदेश येथे महंमद करीम यांनी स्वीकारला हिंदु धर्म !

अमन शहा असे करण्यात आले नामकरण !

महंमद करीम यांनी स्वीकारला हिंदु धर्म

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशची राजधानी लक्ष्मणपुरीमधील श्री नीलकंठ मंदिरात गोरखपूर येथील महंमद करीम नावाच्या एका मुसलमान तरुणाने हिंदु धर्म स्वीकारला. आचार्य कुलदीप शुक्ल यांनी मंदिरात वैदिक पद्धतीने हवन आणि पूजा-पाठ करून त्यांना हिंदु धर्मात प्रवेश दिला. यासमवेतच त्यांचे अमन शहा, असे नामकरण केले. या वेळी अमन यांनी गंगेच्या पाण्याने स्नान केले आणि नंतर गोमूत्र प्राशन केले. राष्ट्रीय युवा वाहिनीचे राष्ट्रीय अध्यक्ष हिंदु देवप्रकाश शुक्ला यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पार पडला.

हिंदु धर्म स्वीकारल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलतांना अमन शहा म्हणाले, ‘‘सनातन धर्म हा जगातील सर्वांत प्राचीन आणि सहिष्णु धर्म आहे. यामध्ये व्यक्तीला पूर्ण स्वातंत्र्य आणि आदर मिळतो. ‘मी माझ्या पूर्ण इच्छाशक्तीने आणि समजूतदारपणाने हा निर्णय घेतला आहे. माझ्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव नाही.’’

शीख समुदायातील १ सहस्र लोकांचाही हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !

ख्रिस्ती पंथ स्वीकारलेल्या शीख समुदायातील १ सहस्र लोकांनी शीख संघटनांच्या सततच्या प्रयत्नांमुळे ‘घरवापसी’ (हिंदु धर्मात पुनर्प्रवेश) केली. ‘अखिल भारतीय शीख पंजाबी कल्याण परिषद’ आणि ‘लखनऊ गुरुद्वारा प्रबंधक समिती’ यांनी लक्ष्णणपुरी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणाले की, पिलीभीतमध्ये नेपाळच्या सीमेला लागून असलेल्या बेल्हा, ततारगंज उपाख्य सिंघारा, वामनपुरी इत्यादी १२ गावांमध्ये अनुमाने २२ सहस्र लोक रहातात. या गावांतील बहुसंख्य लोक शीख समुदायाचे आहेत. अंधश्रद्धा, निरक्षरता आणि मूलभूत सुविधांचा अभाव, यांचा अपलाभ उठवत ख्रिस्ती मिशनर्‍यांनी येथे मोठ्या प्रमाणात धर्मांतर केले आहे.