भारत आणि कॅनडा यांच्या द्विपक्षीय बैठकीत निर्णय

कनानास्किस (कॅनडा) – येथे १७ जून या दिवशी झालेल्या ‘जी-७’ (कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन आणि अमेरिका या ७ विकसित देशांचा गट) शिखर परिषदेसाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पाहुणे म्हणून उपस्थित होते. यानंतर कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी आणि पंतप्रधान मोदी यांच्यात द्विपक्षीय बैठक झाली. या वेळी भारत आणि कॅनडा यांच्यामध्ये उच्चायुक्तांना पुन्हा नियुक्त करण्यासाठी करार झाला. खलिस्तानी आतंकवादी निज्जरच्या हत्येनंतर गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये दोन्ही देशांनी प्रत्येकी ६ राजनैतिक अधिकार्यांना देशातून काढून टाकले होते.
या बैठकीनंतर पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत आणि कॅनडा यांच्यामधील संबंध अत्यंत महत्त्वाचे आहेत. भारताला ‘जी-७’ परिषदेत आमंत्रित केल्यासाठी मी तुमचा (कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांचा) आभारी आहे. मी भाग्यवान आहे की, मला वर्ष २०१५ नंतर पुन्हा एकदा कॅनडामध्ये येऊन कॅनडाच्या लोकांशी संपर्क साधण्याची संधी मिळाली.
पंतप्रधान मोदी या वेळी शिखर परिषदेत फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी, जर्मन चान्सलर फ्रेडरिक मर्झ, मेक्सिकोचे अध्यक्ष क्लॉडिया शेनबॉम पारडो, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज, दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा आणि दक्षिण कोरियाचे अध्यक्ष ली जे म्युंग यांची भेट घेतली. यानंतर पंतप्रधान मोदी क्रोएशियाला मार्गस्थ झाले.