लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – ‘कॉम्प्रेस्ड बायो गॅस’ (सीबीजी) क्षेत्रात उत्तरप्रदेश संपूर्ण भारतात पहिल्या क्रमांकावर आहे. राज्यात गोशाळांमध्ये आणखी ‘कॉम्प्रेस्डथ बायो गॅस’ (सीबीजी) प्रकल्प उभारले जातील. येथे पंचगव्यसुद्धा बनवले जाईल. गोसेवा आयोग आणि पशूसंवर्धन विभाग संयुक्तपणे या प्रकल्पांना अंतिम रूप देत आहेत.गोशाळांमध्ये बसवलेल्या ‘सीबीजी’ प्रकल्पांमध्ये जवळचे शेतकरी गायीचे दूध, दही, शेण आणि मूत्र इत्यादी विकू शकतील. यामुळे केवळ गोशाळांचे उत्पन्न वाढणार नाही, तर परिसरातील शेतकर्यांचे उत्पन्नही वाढेल. उत्तरप्रदेशासह राजस्थान, मध्यप्रदेश, बंगाल, महाराष्ट्र इत्यादी राज्यांमधील गोशाळांमध्ये ‘सीबीजी’ प्रकल्प चालू आहेत.
१. पाण्यात गायीचे दूध, दही, तूप, गोमय (शेण) आणि गोमूत्र मिसळून पंचगव्य बनवले जाते. हिंदु धर्मात धार्मिक विधी आणि आयुर्वेदिक औषधे यांमध्ये हे मिश्रण वापरले जाते. आयुर्वेद विभागाचे माजी संचालक प्रा. पी.सी. सक्सेना म्हणाले की, पंचगव्य वापरल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. ‘सीबीजी’ प्रकल्पात पंचगव्य बनवले जाते.
२. उत्तरप्रदेश सरकारने ४७ ‘सीबीजी’ प्रकल्प संमत केले आहेत. सर्वांत मोठा ‘सीबीजी’ प्रकल्प मथुरा येथे स्थापन करण्यात आला आहे. संपूर्ण देशात सर्वाधिक १९ टक्के ‘सीबीजी’ प्रकल्प एकट्या उत्तरप्रदेशात असून त्यानंतर गुजरात (१६ टक्के) आणि महाराष्ट्र (९ टक्के) यांचा क्रमांक लागतो, असे गोसेवा आयोगाचे अध्यक्ष श्याम बिहारी गुप्ता यांनी सांगितले.