Jaffar Express Attacked Again : पाकमध्ये जाफर एक्सप्रेसवर पुन्हा आक्रमण : अनेक प्रवासी घायाळ

क्वेटा (बलुचिस्तान) – पाकमधील जाफर एक्सप्रेसवर पुन्हा एकदा आक्रमण झाले आहे. जकोबाबादजवळ रेल्वे रुळावर झालेल्या मोठ्या स्फोटानंतर या गाडीचे ६ डबे रुळावरून घसरले. ही गाडी पेशावरहून क्वेटा येथे जात होती. स्फोटामुळे रेल्वे रुळावर ३ फूट रुंद खड्डा पडला आणि अनुमाने ६ फूट लांबीचे रेल्वे रुळ पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. प्राथमिक माहितीनुसार, या स्फोटात अनेक प्रवासी घायाळ झाले आहेत.

याचवर्षी मार्चमध्ये ‘बलुचिस्तान लिबरेशन आर्मी’ने या एक्सप्रेसचे अपहरण केले होते. या गाडीमध्ये पाक सैन्याचे अधिकारी आणि सैनिक प्रवास करत होते. त्यांना काही दिवस ओलीस ठेवण्यात आले होते. यातील १०० हून सैनिकांना ठार मारल्याचा दावा या ‘बलुचिस्तान लिबरेशन आर्मी’ने केला होता. नंतर पाक सैन्याने कारवाई करून या गाडीची सुटका केली होती. आताचे आक्रमणही या संघटनेने केल्याचा संशय आहे.