युद्ध चालू होत असून ज्यू राजवटीवर दया दाखवणार नाही ! – Iran’s Supreme Leader Khamenei

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांची घोषणा

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी व इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू

तेल अविव  (इस्रायल) – युद्ध चालू होत आहे. आम्ही आतंकवादी ज्यू राजवटीला सडेतोड प्रत्युत्तर देऊ. आम्ही त्यांना कोणतीही दया दाखवणार नाही, अशी घोषणा इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत केली. यामुळे आता इराण-इस्रायल यांच्यातील संघर्षाला ‘युद्ध’ म्हटले जाऊ लागले आहे. खामेनी यांच्या घोषणेनंतर इराणने इस्रायलवर २५ क्षेपणास्त्रे डागली.

या युद्धात अमेरिका सहभागी होऊ शकते, असे म्हटले जात आहे. १७ जूनला कॅनडा येथील ‘जी-७’ शिखर परिषद अर्धवट सोडून अमेरिकेत परतलेले राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये राष्ट्रीय सुरक्षा पथकावमवेत बैठक घेतली आणि अमेरिकेने मध्य पूर्वेत अधिक लढाऊ विमाने पाठवण्याचा निर्णय घेतला. यामुळेच अमेरिका या युद्धात सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गेल्या ६ दिवसात या युद्धात २२४ इराणी नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर १ सहस्र ४८१ जण घायाळ झाले आहेत. दुसरीकडे इस्रायलमध्ये आतापर्यंत २४ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ६०० हून अधिक जण घायाळ झाले आहेत.

खामेनी कुठे लपले आहेत ?, हे आम्हाला ठाऊक असले, तरी आम्ही त्यांना ठार मारणार नाही ! –  डॉनल्ड ट्रम्प  

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले की,  तथाकथित सर्वोच्च नेते (आयतुल्ला अली खामेनी) कुठे लपले आहेत ?, हे आम्हाला चांगलेच ठाऊक आहे. ते सोपे लक्ष्य आहेत; पण ते तिथे सुरक्षित आहेत. आम्ही त्यांना बाहेर काढणार नाही. (मारणार नाही.) किमान सध्या तरी नाही; कारण आम्हाला नागरिकांवर किंवा सैनिकांवर क्षेपणास्त्रे डागायची नाहीत; पण आमचा संयम सुटत चालला आहे, अशी चेतावणी त्यांनी दिली.

इराणवरील आकाशावर आमचे पूर्ण नियंत्रण ! – ट्रम्प

ट्रम्प यांनी पुढे म्हटले की, आता आमचे इराणवरील आकाशावर पूर्ण नियंत्रण आहे. इराणकडे चांगले ‘स्काय ट्रॅकर्स’ आणि इतर संरक्षणात्मक उपकरणे भरपूर होती; पण त्याची तुलना अमेरिकेने निर्माण केलेल्या गोष्टींशी होऊ शकत नाही. अमेरिकेपेक्षा हे कुणीही चांगले करू शकत नाही.

इस्रायलने जगाला अणूयुद्धाच्या उंबरठ्यावर आणले ! – रशिया

इस्रायलकडून इराणच्या शांततापूर्ण आण्विक तळांवर होणारी आक्रमणे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला आहे. इस्रायलच्या आक्रमणांनी जगाला आण्विक युद्धाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले आहे, अशी टीका रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने काढलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

इराणचा आण्विक कार्यक्रम पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर ?

इराणचा संपूर्ण आण्विक कार्यक्रमच नष्ट करण्याच्या उंबरठ्यावर आम्ही आहोत, असा दावा इस्रायलकडून करण्यात आला आहे. इस्रायलने इराणमधील नेतान्झ आण्विक तळावर क्षेपणास्त्रांद्वारे आक्रमण करून तेथे मोठा विध्वंस घडवून आणल्याचे उपग्रहांच्या छायाचित्रांवरून स्पष्ट झाले आहे; मात्र या आण्विक तळांवर मोठ्या प्रमाणावर यंत्रसामग्री आणि इतर साहित्य हे भूमीखाली खोलवर असल्यामुळे त्यांची नेमकी किती हानी झाली आहे ?, हे अद्याप समजू शकलेले नाही.

आम्हीही इराणच्या शासनकर्त्यांच्या अत्याचारांचे पीडित आहोत ! – जर्मनी

इस्रायल इराणला धडा शिकवण्याचे काम आमच्यासाठीच करत आहे. आम्हीही  इराणच्या शासनकर्त्यांच्या अत्याचारांचे पीडित आहोत. इराणमधील या राज्यकर्त्यांनी जगभरात मृत्यू आणि विध्वंस घडवून आणला आहे, अशी प्रतिक्रिया जर्मनीचे चॅन्सलर फ्रेडरिक मार्झ यांनी व्यक्त केली आहे.

इराणच्या नागरिकांनी व्हॉट्स ॲप हटवावे ! – इराण सरकारचा आदेश

इराण सरकारने नागरिकांना त्यांच्या स्मार्टफोनवरून व्हॉट्स ॲप काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. व्हॉट्स ॲपवरील माहितीचा उपयोग इस्रायलला पाठवण्यासाठी केला जाऊ शकतो, असे या आदेशात म्हटले आहे. यासह टेलिग्राम आणि अन्य ॲपही हटवण्यास सरकारने सांगितले आहे.

इराण सरकारने व्हॉट्स ॲप किंवा तिची मालकी असणार्‍या ‘मेटा’ आस्थापनाकडे  कुठलीही विचारणा केलेली नाही, असे मेटाने म्हटले आहे. ‘व्हॉट्स ॲप’वर होणारे चॅट (संदेशाची देवाणघेवाण) आणि त्यातील माहिती कुणीही मध्यस्थ वाचू शकत नाही. आम्ही कोणत्याही सरकारला मोठ्या प्रमाणात माहिती पुरवत नाही, असेही ‘मेटा’कडून सांगण्यात आले.