(‘फास्टटॅग’ म्हणजे पथकर नाक्यांवर थांबावे लागू नये, यासाठी वाहनांना दिलेला सांकेतिक कोड. हा कोड आपोआप स्कॅन होऊन आपोआप पथकर भरला जातो.)

नवी देहली – केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ‘फास्टटॅग’विषयी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी खासगी वाहनांसाठी ३ सहस्र रुपयांचा ‘फास्टटॅग’ आधारित वार्षिक पास देण्याची घोषणा केली. हा पास १५ ऑगस्ट २०२५पासून लागू होईल. नितीन गडकरी म्हणाले की, पास सक्रीय झाल्याच्या तारखेपासून एक वर्ष किंवा २०० फेर्या (ट्रिप), जे आधी असेल, तोपर्यंत वैध असेल. कार, जीप आणि व्हॅन यांसारख्या बिगर व्यावसायिक खासगी वाहनांसाठी या पासाची रचना केली आहे. यामुळे देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवर विनाथांबा प्रवास शक्य होईल.
१. वार्षिक पास घेण्यासाठी किंवा त्याचे नूतनीकरण करण्यासाठी लवकरच ‘हायवे ट्रॅव्हल ॲप’ आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या ‘वेबसाइट’वर एक वेगळी लिंक उपलब्ध करून दिली जाईल, असे गडकरी यांनी म्हटले आहे.
२. केंद्रीय मंत्र्यांनी ‘एक्स’वर असेही लिहिले की, प्रतीक्षा वेळ अल्प करून, गर्दी अल्प करून आणि पथकर नाक्यांवरील वाद दूर करून, वार्षिक पास धोरण लाखो खासगी वाहन चालकांसाठी जलद, सुरळीत अन् चांगला प्रवास अनुभव देण्यासाठी वचनबद्ध आहे.