हत्ती आणि गवारेडे यांच्याकडून शेती अन् बागायती यांची हानी

प्रतिकात्मक छायाचित्र

दोडामार्ग – तालुक्यातील तळकट परिसरात हत्तींनी फळबागायतीची हानी केली आहे. हत्तींच्या कळपाने केळी, नारळ, सुपारी या बागांची हानी केल्याने शेतकर्‍यांची लाखो रुपयांची हानी झाली आहे. सातत्याने हत्तींचा उपद्रव होत असतांनाही प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नसल्याने येथील शेतकरी आणि ग्रामस्थ संताप व्यक्त करत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी हत्ती फळ बागायतीत घुसून मोठ्या प्रमाणात हानी करतात.

सावंतवाडी तालुक्यातील आंबोली येथील नांगरतास परिसरातील शेतकरी गवारेड्यांच्या त्रासाने हैराण झाले आहेत. गवारेडे ऊस आणि भातशेती यांची मोठ्या प्रमाणात हानी करत आहेत. सध्या शेतीचा हंगाम असल्याने शेतकर्‍यांनी केलेल्या भात पेरणीची हानीही हे गवारेडे करत आहेत. वन विभागाला याची माहिती देऊनही त्याची नोंद घेतली जात नसल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत.

संपादकीय भूमिका

गेली अनेक वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वन्यप्राणी शेती-बागायतींची हानी करत आहेत. यावर तात्कालिक उपाययोजना वगळता प्रशासनाकडून ही समस्या कायमस्वरूपी सुटावी, यासाठी ठोस प्रयत्न झालेले दिसत नाहीत. अनेक वर्षे ही समस्या न सुटणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !