पंढरपूर – पंढरपूरकडे आषाढी वारीसाठी जाणार्या वारकर्यांच्या वाहनांना पथकर माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. १८ जून ते १० जुलै या कालावधीत ही पथकर माफी दिली जाणार आहे. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाने एक परिपत्रक काढले असून त्यात पंढरपूर येथे जाणार्या जड आणि हलक्या अशा दोन्ही प्रकारच्या वाहनांना ही सूट असेल. त्यासाठी गाडी क्रमांक आणि चालकाचे नाव नोंद करून त्यांचे स्टिकर्स परिवहन विभाग, पोलीस अथवा प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
सर्व पथकर नाक्यांवर स्वतंत्र पोलीस यंत्रणा तैनात करावी, परिवहन विभागाने अधिकच्या गाड्या सोडाव्यात, वाहतूक सुरक्षित रहाण्यासाठी योग्य त्या ठिकाणी पोलिसांची व्यवस्था करावी, असे आदेशही देण्यात आले आहेत. आपत्कालीन स्थितीत मुंबई-पुणे मार्गावर, तसेच सर्व रस्त्यांवर रुग्णवाहिका आणि क्रेनची व्यवस्था करावी, राज्यभरातून पंढरपूरला जाणार्या रस्त्यांवरील खड्डे भरून घ्यावेत, दुरुस्ती करावी, सूचना फलक लावावेत, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.