विद्यार्थ्यांच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली
मडगाव, १७ जून (वार्ता.) – येथील सेंट जोसेफ विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाण्यासाठी आलेल्या ‘बालरथा’त बसत असतांना काही विद्यार्थ्यांना बसमधून धूर येत असल्याचे दिसले. विद्यार्थ्यांनी तातडीने याची माहिती बसचालक आणि अन्य यांना देऊन सावध केल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
मडगाव अग्नीशमन दलाचे अधिकारी गिल सोझा यांनी दिलेल्या माहितीनुसार १७ जून या दिवशी सकाळी ११.३० वाजता ‘बालरथा’ला आग लागल्याची माहिती त्यांना मिळाली. अग्नीशमन दलाच्या कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता बसच्या बॅटरीच्या ठिकाणी असलेल्या ‘वायरिंग’मध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याचे समोर आले. अग्नीशमन दलाच्या कर्मचार्यांनी ही आग लगेच विझवली.