ग्रामीण भागातील धोकादायक पूल काढणार !

पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचा निर्णय

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

पुणे – कुंडमळा येथील पूल दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील गावे, वाड्या, वस्त्या यांना जोडणार्‍या लहान पुलांचे (साकव) यापूर्वी स्थापत्य परीक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) करण्यात आले होते. त्यातील धोकादायक ठरलेले साकव काढण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. शासकीय यंत्रणांनी केलेला स्थापत्य परीक्षणाचा अहवाल तातडीने सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासंदर्भात २ दिवसात बैठक घेणार असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले.

कुंडमळा अपघातावर चौकशी समिती

कुंडमळा लोखंडी पूल अपघातानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी अपर जिल्हाधिकारी सुहास मापारे यांच्या अध्यक्षतेखाली ६ जणांची चौकशी समितीची नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडून १५ दिवसांमध्ये अहवाल प्राप्त होईल.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका ३२ पुलांचे लेखा परीक्षण करणार

शहरातील विविध भागांत रेल्वे मार्ग, नदी, चौक आणि महामार्ग यांवर वाहतुकीच्या सोयीसाठी ३२ ठिकाणी पूल आणि उड्डाणपूल उभारले आहेत. त्यातील दापोडी येथील ‘हॅरिस पुला’ला १३० वर्षे, चिंचवड येथील चिंचवड रेल्वे पुलाला ४७ वर्षे आणि पिंपरीतील ‘इंदिरा गांधी पुला’ला ४२ वर्षे पूर्ण झाली आहेत. बहुतांश पुलांचे आयुर्मान २० वर्षांच्या आतील आहे. ४ पुलांना ३० वर्षांपेक्षा अधिक कालावधी झालेला आहे. ३ पुलांची दुरुस्तीची कामे चालू आहेत. त्यामुळे शहरातील सर्वच पुलांचे स्थापत्य परीक्षण करण्यात येणार आहे.

संपादकीय भूमिका

कुंडमळा येथील पूल दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय का घेतला जातो ? धोकादायक पुलांविषयीचे निर्णय समयमर्यादेत घेणे आवश्यक आहे !