सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ८१३ पैकी ४०६ साकव नादुरुस्त

  • पुणे येथे इंद्रायणी नदीवरील कुंडमळा पूल कोसळल्यानंतर सिंधुदुर्ग प्रशासन सतर्क

  • नवीन ६५० साकव बांधण्याची आवश्यकता

(साकव म्हणजे रहदारीसाठी बांधलेला छोटा पूल)

सिंधुदुर्ग – सिंधुदुर्ग जिल्ह्यात सद्य:स्थितीत ८१३ साकव असून त्यापैकी १६९ साकव सुस्थितीत आहेत, तर ४०६ नादुरुस्त आहेत. त्यासाठी ३३ कोटी १४ लाख रुपये निधीची आवश्यकता आहे. जिल्ह्यात ६५० नवीन ठिकाणी साकव बांधण्याची आवश्यकता आहे. यापैकी ३१३ नवीन साकव बांधण्याचे नियोजन असून त्यासाठी ९७ कोटी रुपये निधीची आवश्यकता आहे.

नादुरुस्त साकवांचा नागरिकांनी वापर करू नये, यासाठी अशा साकवांच्या ठिकाणी फलक लावण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अभियंता राजेंद्र सावंत, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत आदी उपस्थित होते.

या वेळी खेबुडकर पुढे म्हणाले, ‘‘पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीवरील कुंडमळा पूल कोसळल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनीही जिल्ह्यातील साकवांचा आढावा घेतला असून नादुरुस्त साकवांची माहिती गोळा करण्याची सूचना त्यांनी दिली आहे. त्यानुसार कार्यवाही चालू करण्यात आली आहे.’’

संपादकीय भूमिका

सिंधुदुर्ग जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात साकव नादुरुस्त असणे म्हणजे प्रशासन जनतेच्या जीवाशी खेळत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरेल का ?