सातारा, १७ जून (वार्ता.) – कराड तालुक्यातील साजूर, साकुर्डी, सुपने, केसे या गावांतील सरकारी नोंद असलेल्या गावठाणांचा प्रश्न सोडवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे विधान पर्यटन, खणीकर्म, माजी सैनिक कल्याणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. पाटण येथील शासकीय विश्रामगृहात घेण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते.
मंत्री शंभुराज देसाई म्हणाले, ‘‘गावठाणांचा प्रलंबित प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी विभागीय आयुक्त यांच्या वतीने प्रस्ताव पाठवून तो शासनस्तरावर सादर करण्यात येईल. शासनस्तरावर बैठक घेऊन याला शासन मान्यता घेण्यासाठी प्रयत्न होईल. यासाठी तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांनी विस्तृत प्रस्ताव पाठवावा. गावठाणचा प्रश्न प्रलंबित असलेल्या नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता संबंधित विभागांनी घ्यावी.’’