मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्या गोवा क्रांती दिनानिमित्त शुभेच्छा !

पणजी – गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि राज्यपाल यांनी गोवा क्रांती दिनाच्या निमित्ताने जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात या दिवसाला विशेष महत्त्व आहे.

स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करूया ! – मुख्यमंत्री सावंत

डॉ. प्रमोद सावंत

मुख्यमंत्री सावंत यांनी त्यांच्या संदेशात म्हटले आहे की, गोवा क्रांती दिनाचे गोमंतकियांसाठी विशेष महत्त्व आहे; कारण १८ जून १९४६ या दिवशी गोवावासियांनी पोर्तुगीज वसाहतवादी राजवटीने केलेल्या हिंसाचाराच्या विरोधात उघड बंड केले होते. या दिवशी डॉ. राम मनोहर लोहिया आणि डॉ. जुलियाओ मिनेझिस यांनी निर्भीड भाषणाने अत्याचारी पोर्तुगीज राजवटीविरुद्ध लढण्याचे धैर्य निर्माण केले. मडगाव येथे डॉ. राम मनोहर लोहिया यांनी पेटवलेली ठिणगी हा स्वातंत्र्य चळवळीचा अंतिम टप्पा होता, ज्याची परिणती गोव्याच्या मुक्तीमध्ये झाली. आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या शौर्याचे स्मरण करून त्यांना अभिवादन करण्याचा आणि आदरांजली वहाण्याचा हा दिवस आहे. आपण सर्व क्षेत्रांमध्ये विकासाची अधिक उंची गाठण्यासाठी स्वतःला पुन्हा वचनबद्ध करून कष्टाने मिळवलेल्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करूया.

 

गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील अविस्मरणीय दिवस ! – राज्यपाल पिल्लई

राज्यपाल पी.एस्. श्रीधरन् पिल्लई

राज्यपालांनी त्यांच्या संदेशात म्हटले आहे की, गोवा क्रांती दिन हा राज्याच्या इतिहासातील सर्वांत निर्णायक घटनांपैकी एक आहे आणि पोर्तुगीज वसाहतवादी राजवटीतून आपल्या मातृभूमीची पुनर्स्थापना करण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे स्वातंत्र्यसैनिक आणि हुतात्मे यांच्या बलीदानाचे स्मरण करण्यासाठी प्रतिवर्षी १८ जून या दिवशी हा कार्यक्रम साजरा केला जातो. मडगाव येथील १८ जून १९४६ ची सायंकाळ हा गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील अविस्मरणीय दिवस आहे. या संस्मरणीय प्रसंगी, आपण सर्वांनी सर्व हुतात्मा आणि स्वातंत्र्यसैनिक यांना आदरांजली वाहूया. त्यांनी त्यांच्या शौर्याद्वारे गोव्याला भारताचा भाग बनण्यास आणि स्वतःचे भाग्य निश्‍चित करण्यास सक्षम केले. या अविस्मरणीय दिवशी आपण भारत आणि गोवा राज्य ‘विकसित भारत विकसित गोवा, २०४७’ च्या मार्गावर नेण्यासाठी स्वतःला पुन्हा समर्पित करूया.