जुने गोवे येथील ‘हात कातरो खांब’ बनला दारुड्यांचा अड्डा !

प्रखर हिंदुत्वनिष्ठ शेफाली वैद्य यांनी व्हिडिओ प्रसारित करून दिली माहिती

सौ. शेफाली वैद्य

पोर्तुगिजांनी गोमंतकीय हिंदूंवर लादलेल्या ‘इन्क्विझिशन’ची (धर्मच्छळाची) एकमेव साक्ष आहे ‘हात कातरो खांब’ !

पणजी, १७ जून (वार्ता.) – पोर्तुगिजांनी गोमंतकीय हिंदूंवर क्रूरपणे ‘इन्क्विझिशन’ लादले आणि त्याद्वारे हिंदूंचा अनन्वित छळ करून हिंदूंचे धर्मांतर केले. या ‘इन्क्विझिशन’ची एकमेव साक्ष अजूनही गोव्यात उपलब्ध आहे, ती म्हणजे जुने गोवे येथील ‘हात कातरो खांब’ ! हा ऐतिहासिक ‘हात कातरो खांब’ सध्या दारुड्यांचा अड्डा बनला आहे. इतिहासाच्या अभ्यासिका आणि प्रखर हिंदुत्वनिष्ठ शेफाली वैद्य यांनी यासंबंधी एक व्हिडिओ प्रसारित करून माहिती दिली आहे. मूळ व्हिडिओ ‘युगांतर गोवा’ यांनी सिद्ध केला आहे.

ऐतिहासिक ‘हात कातरो खांबा’चा गैरवापर

या व्हिडिओत म्हटले आहे की, ‘हात कातरो खांबा’मध्ये बळजोरीने होणार्‍या धर्मांतराला विरोध करून मृत्यूला कवटाळणार्‍यांच्या वेदना सामावलेल्या आहेत; मात्र आजच्या घडीला या पवित्र खांबाचा गैरवापर केला जात आहे. या खांबाच्या चौथर्‍यावर कामगार लोक खायला आणि (दारू) प्यायला बसतात, तसेच हे ठिकाण अस्वच्छ करतात अन् वेळप्रसंगी या ठिकाणी भांडणेही करतात.

हा ऐतिहासिक खांब आज टाकाऊ वस्तू टाकण्याचे ठिकाण बनले आहे. ‘हात कातरो खांब’ हा केवळ एक खांब नसून तो गोमंतकियांनी दाखवलेले धैर्य आणि बलीदान यांचे प्रतीक आहे. आमचा इतिहास आणि वारसा यांचे संरक्षण केले पाहिजे. हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोचवून या विरोधात आवाज उठवला पाहिजे.

‘हात कातरो खांबा’ची स्थिती अत्यंत लाजिरवाणी ! – शैफाली वैद्य

गोमंतकियांवर लादलेल्या क्रूर ‘इन्क्विझिशन’ची साक्ष असलेला ‘हात कातरो खांब’ हा गोव्याच्या इतिहासातील एका भीषण काळाचा साक्षीदार आहे. हा खांब सध्या अत्यंत दुर्लक्षित अवस्थेत आहे. याची होत असलेली विटंबना अत्यंत संतापजनक आहे. ‘गोवा इन्क्विझिशन’च्या क्रूर अत्याचारांची आठवण करून देणारा हा ऐतिहासिक अवशेष दारुड्या आणि अमली पदार्थांचे सेवन करणार्‍या लोकांसाठी अड्डा बनल्याचे पाहून धक्काच बसला. ही परिस्थिती अत्यंत लाजिरवाणी आहे. या खांबाचे पावित्र्य टिकवून ठेवणे आवश्यक आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग जुने गोवे येथील चर्चची देखभाल करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करते; मात्र जुने गोवे येथेच असलेल्या खांबाकडे दुर्लक्ष करते, अशी खंत शैफाली वैद्य यांनी त्यांच्या फेसबुक खात्यावर व्यक्त केली आहे.

‘हात कातरो खांबा’ची यापूर्वीही झाली विटंबना

‘हात कातरो खांबा’ची विटंबना होण्याचा आजचा प्रकार नवीन नाही. असा प्रकार यापूर्वीही घडलेला आहे; मात्र त्याकडे शासनाकडून दुर्लक्ष झालेले आहे. यापूर्वी या खांबालाच अज्ञाताने पिवळा रंग मारला होता. यावर पुढे हिंदुत्वनिष्ठांकडून टीका झाली होती. ‘हात कातरो खांबा’चा गैरवापर होण्याचा प्रकार यापूर्वीही घडला आहे.