गोवा आणि येथील सांस्कृतिक प्रवाह

आज, १८ जूनला गोवा क्रांतीदिन आहे. त्या निमित्ताने…

‘गोवा, गोमंतक, अपरांत, सुनापरांत, अशा अनेक नावांनी पूर्वापार सुशोभित अशी ही भूमी आहे. एकप्रकारे ‘शापित’ अशी ही भूमी ठरलेली आहे. खोल अंतर्आत्म्यातून हा ‘शापितपणा’चा दाह मला नेहमीच जाणवत आलेला आहे आणि ‘त्या शापितपणाच्या दाहातून राज्याच्या आणि गोव्याच्या लोकांची त्वरित सुटका व्हावी’, असे मनोमन मला वाटत आलेले आहे. 

श्री महेश पारकर

१. दारूमुळे गोव्याची झालेली लज्जास्पद प्रतिमा

‘गोमंतकीय नागरिक म्हटला की, तो दारूडा, व्यसनी असलाच पाहिजे’, अशी त्याची आज जनमानसांत प्रतिमा बनलेली आहे. ‘दिवस-रात्र तो दारू, बाटलीच्या परिघात आयुष्य व्यतित करतो’, असाही गैरसमज उर्वरित देशाने करून घेतलेला आहे. छोट्याशा गोव्यातील वाढत्या ‘बार’च्या संख्येमुळे पिणार्‍यांची संख्याही वाढती आहे. हे समीकरण देशाच्या जनतेमध्ये ठळकपणाने स्पष्ट झालेले आहे. त्यामुळे गोवा, म्हणजे ‘पूर्णपणे दारूच्या आहारी गेलेला समाज’, हे चित्र ठळकपणे जनमानसांत रूजणे, यात काहीही वावगे नाही. पर्यटनाच्या नावाखाली गेल्या काही दशकांमध्ये गोमंतभूमीची लाज ज्या प्रकारे उघड्यावर पडलेली आहे, त्याचे परिणाम आज सुस्वभावी, तसेच शांत गोमंतकीय भोगत आहेत. ही खरी वस्तूस्थिती आहे.

पोर्तुगीज राजवटीच्या ४५० वर्षांच्या भोगविलासी राजवटीचा वरंवटा या गोमंतकभूमीला भोगावा लागला. त्यांच्या दृश्य-अदृश्य परिणामांतून गेल्या ६८ वर्षांच्या स्वकीय राजवटीतही अजून सुटका झालेली नाही. युरोपियन लोकांना त्यांच्या भूभागात सहजरित्या लागणारे अपेयपान त्या लोकांनी येथल्या भूमीत आणले. त्यांनी गोमंतकियांना लावलेली दारू पिण्याची चटक, ही येथील जनतेला आज चारही बाजूंनी वेढा घालून बसलेली दिसते. त्यातून सुटका कधीकाळी होईल का ? प्रचंड शक्तीच्या माणसांनी येऊन सर्वांगाने उठाव करून हे दारूचे व्यसन येथून उखडून टाकावे लागेल. इतक्या खोलवर या व्यसनाची पाळेमुळे आज गोमंतकभूमीत रूतून बसलेली आहेत. पावलागणिक किरकोळ बार आणि त्यासमवेत होलसेल दारू विक्री केंद्र हे वयस्कर, तसेच विद्यार्थ्यांना, अल्पवयीन बालकांना कसले धडे देणार ? दारूच्या आकर्षणाचे प्राथमिक संस्कारच बालपिढीवर होणे, हे अपरिहार्य झाल्यासारखे नव्हे का ? डोळ्यांपुढे दिसणार्‍या रंगीबेरंगी बाटल्यांमध्ये कसले द्रव्य भरलेले असणार ? साहजिकच त्या द्रव्यांची चव घेण्याची प्रेरणा नव्या पिढ्यांना नाही झाली, तरच नवल आहे. आज या बार वजा होलसेल दुकानांमध्ये दिवस-रात्र होणारी पुष्कळ गर्दी काय सांगते ?

२. दारूच्या सेवनामुळे घरोघरी झालेली दुःस्थिती

परकीय पोर्तुगीज शासकांनी आणून सोडलेल्या दारूच्या व्यसनाने आज सर्व सीमा ओलांडलेल्या आहेत. गोमंतकियांच्या रक्ताच्या अणूरेणूमध्ये या व्यसनाने शिरकाव केलेला आहे. साहजिकच जर वयस्कर माणसे दारू घेतात, तर आम्हा नव्या पिढ्यांना ती चव बघायला काय आडकाठी आहे ? अशा प्रकारच्या दुष्टचक्रामध्ये गोमंतकीय जनता भरडत चालली आहे. अशा या दारूच्या व्यसनाने आरोग्याच्या दृष्टीने हाहाःकार माजवलेला आहे. आज वयाची चाळीशी, पन्नाशी गाठणे कठीण, अशी स्थिती दारूसेवनामुळे घरोघरी झालेली दिसते. विशेषतः ग्रामीण भाग होरपळून जात असलेला दिसत आहे. ‘दारूविना मौजमजेत वेळ घालवण्याचे किंवा सण, तसेच वाढदिवस, लग्नमेजवान्या साजरे करण्याचे दुसरे चांगले साधन नाही’, अशा मानसिकतेमध्ये येथील नागरिकांचे भवितव्य किती भीषण बनले आहे, याचे प्रात्यक्षिक आज गोव्यातील प्रत्येक भागामध्ये दिसत आहे.

३. बिघडत चाललेल्या समाजाला चांगल्या मार्गावर आणण्यासाठीचे प्रयत्न करण्याची संधी

दारूच्या प्रेमापोटी झालेल्या अनैसर्गिक अवस्थेतून सामान्यजनांना बाहेर काढण्याचे प्रयत्न ब्रह्मीभूत सद्गुरु ब्रह्मेशानंद स्वामी (दत्त पद्मनाभ पीठ, तपोभूमी, कुंडई, गोवा) यांनी केले होते. आरंभीच्या दशकात भंडारी समाजाच्या शिष्यसंप्रदायाची संघटना स्थापून त्यांना देवकार्यात गुंतवून सद्गुरु ब्रह्मेशानंद स्वामी यांनी लोकांच्या व्यसनाधिनतेवर बरेच नियंत्रण मिळवले होते. आजही त्या कार्याची महानता गोव्यात सर्वत्र वाखाणली जात आहे. दारूच्या व्यसनापासून ज्येष्ठांची मुक्तता करणे, नवीन पिढ्यांना त्या व्यसनांचा विळखा पडू नये, यावर कार्य करण्यास गोव्यात भरपूर वाव आहे. प्रत्येक व्यक्तीने स्वतःचे आयुष्य चांगल्या कार्यामध्ये गुंतवून, वाईट गोष्टींपासून अलिप्त राहून समाजाचे ऋण फेडावे, हे ध्येय नवीन पिढ्यांसमोर ठेवून त्यांना चांगल्या कार्यामध्ये गुंतवून ठेवण्याचे प्रयत्न करणे, ही आज बिघडत चाललेल्या समाजाची प्राथमिक आवश्यकता आहे. देवतांचे वसतीस्थान असलेले आमचे छोटेसे गोवा राज्य हे इतिहासकाळात विस्तीर्ण भूप्रदेश, गोमंतक किंवा अपरांत म्हणवणार्‍या या प्रदेशाचे अस्तित्व एका छोट्याशा राज्यामध्ये सीमित झालेले आहे. आज व्यसनाधिनतेच्या अतिरेकामुळे तेवढेच अपकीर्तही झाले आहे. येथे सर्वकाही आहे. सर्व सुखसाधने, सुविधा पुरवणार्‍या शासकीय यंत्रणा हाकेच्या अंतरावर आहेत; परंतु व्यसनांच्या प्रभावामुळे ‘सर्वकाही असून कुठे काहीच नाही’, अशी मानसिकता जनतेची बनत चालली आहे. देवता किंवा देवालयांच्या जत्रा, तिथे जागर, नाटके करण्याची आवड भरपूर आहे; परंतु सण साजरे करून त्यातून मजा, आनंद प्राप्त करणे, याला मद्यपानावाचून परिपूर्णता नाही, अशा अवस्थेमध्ये गोवेकर समाज पुढे जात आहे.

४. गोमंतकियांनी आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता

गोमंतकीय हा मनाने सालस, सुजाण, कुटुंबवत्सल, धर्म आणि संस्कृती यांनी घालून दिलेल्या नियमांचे यथासांग पालन करत सर्व विधी, प्रथा कर्तबगारीने निभावणारा आहे. सर्व आदर्श पाळत सर्वच गोष्टींमध्ये आदर्श नागरिक बनलेला गोमंतकीय हा दारूच्या अधीन का झाला ? दारू पिण्याने मिळणार्‍या क्षणिक आनंदापोटी इतका पराधीन का झाला ? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याची, सखोल आत्मपरीक्षण करण्याची आज नितांत आवश्यकता आहे. स्वतःचे आयुष्य व्यसनाधीनतेला अर्पण केल्याप्रमाणे इथली माणसे का वागतात ? एक ठराविक सीमित काळ देऊन देव प्रत्येकाला या पृथ्वीतलावर पाठवतो. त्या काळात योग्य प्रकारे जगत, इतरांसाठी वावरून त्यांच्याही आयुष्याचे भले का करू नये ? त्यातून मिळणारे अक्षय्य समाधान माणसांनी का घेऊ नये ? कि असे प्रयत्न करणार्‍या भल्या माणसांच्या प्रयत्नांकडेही संशयाने बघण्याची वृत्ती येथे का वाढत आहे ? योग्य सकारात्मक पद्धतीने एकमेकांना बघण्यास कधीकाळी आपण सिद्ध होणार कि नाही ? शेवटी संस्कृती, संस्कृती म्हणजे तरी काय असते ? माणसाने माणसांसमवेत माणसासारखे चांगले व्यवहार करायची मूळ शिकवणच ना ? दारू पिण्याच्या विकृतीमुळे जर ही शिकवण बाधित होत असेल, तर तो दोष कुणाचा ? साहजिक आहे की, मने बिघडवण्यास कारण ठरणार्‍या दारूपानाचे (मद्यपानाचे) प्रत्येकाने मनावर नियंत्रण ठेवून कुठल्याही स्थितीत माणूसकी जपत व्यवहारज्ञानाची संगत धरून इतरांशी केलेले वर्तन, हाच संस्कृतीचा पहिला पाठ होय.

५. भावी वाटचालीसाठी समाजधुरिणांनी गोमंतकियांना योग्य दिशा दाखवणे महत्त्वाचे !

गोमंतकियांना संस्कृतीचा अभिमान भरपूर आहे. संस्कृतीच्या धोरणांना अनुसरून गोमंतकीय प्रत्येक दिवस घालवतो. तो आनंदाने दिवस सारतो कि जगण्याच्या अनामिक बळजोरीमुळे केवळ आयुष्य सारतो, हे समजणे कठीण. दारूपानामध्ये आनंद, सौख्य शोधत आयुष्य संपवणार्‍या गोमंतकियांना आत्मभानाची जाणीव करून देणे आवश्यक आहे. त्यासाठी नव्या दारू दुकानांना परवाने देण्यावर कायमची बंदी लादली जावी; कारण पाणी डोक्यावरून जाण्याइतपत परिस्थिती दारू पिणार्‍यांनी ओढवून ठेवली आहे. दारू पिणे, हीच आपली संस्कृती कि काय ?, असे मानण्याइतपत वाईट मानसिकता गोव्यातील जनतेची आता झाली आहे. यातून सामान्यजनांची सुटका करण्यासाठी योग्य दिशादर्शक पावले समाजधुरिणांनी उचलावीत, हीच अपेक्षा आहे.’

– श्री. महेश पारकर, गोवा. (१२.६.२०२५)