
कोल्हापूर, १७ जून (वार्ता.) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रातील सरकारला ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. सेवा हा संकल्प मानून पंतप्रधानांनी सुशासन ही संस्कृती मानली आणि देशाच्या सुरक्षेला सर्वाेच्च प्राधान्य दिले. गेल्या ११ वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४० कोटी भारतियांचा विश्वास मिळवत भारताला विकसित करण्यासाठी गतीमान वाटचाल चालू केली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’मधून भारताचे पाकिस्तानमधील आतंकवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आणि आतंकवादाला घरात घुसून उत्तर दिले जाईल, असा संदेश दिला. गेल्या ११ वर्षांत विकसित भारतासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार सर्व स्तरांवर यशस्वी झाले आहे, अशी माहिती भाजपचे खासदार श्री. धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी भाजपचे आमदार श्री. अमल महाडिक, जिल्हाध्यक्ष श्री. नाथाजी पाटील यासंह अन्य उपस्थित होते.
१. क्षेपणास्त्र रक्षण करणारी एस्.-४०० प्रणाली, बह्मोस, आकाश क्षेपणास्त्रे, आय.एन्.एस्. विक्रांत, तेजस हेलिकॉप्टर भारतात बनवून भारत हा संरक्षण उत्पादनात आत्मनिर्भर झाल्याचे जगाला दाखवून दिले. भारताची शस्त्रास्त्र निर्यात ३४ पटीने वाढून २३ सहस्र ६२२ कोटी रुपयांवर पोचली आहे. हे पंतप्रधानांच्या दूरदृष्टीचे फळ आहे.
२. भारत जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याकडे वाटचाल करत आहे. जगातील एकूण डिजिटल व्यवहारांपैकी ४९ टक्के व्यवहार भारतात होतात. भारतात वस्तू आणि सेवा निर्यात ८२५ अब्ज डॉलरपर्यंत पोचली आहे. भारतात ११६ कोटी भ्रमणभाष वापरकर्ते आहेत.
३. वर्ष २०२४ मध्ये चांद्रयान-३ मोहीम यशस्वी झाली. आता गगन यान मोहिमेच्या सिद्धतेत भारत आहे. संशोधक, वैज्ञानिक यांना मोकळीक देऊन सरकारकडून सर्व प्रकारचे साहाय्य केले जात आहे.
४. २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात शेतीसाठी ५ पटीने तरतूद वाढवण्यात आली आहे. ‘पंतप्रधान किसान सन्मान निधी योजने’च्या अंतर्गत ११ कोटींपेक्षा अधिक शेतकर्यांना ३.७ लाख कोटी रुपये देण्यात आले आहेत.