‘आंतरराष्ट्रीय एज्युकेशन सिटी’मुळे २५ टक्के व्ययामध्ये जागतिक शिक्षण उपलब्ध होईल ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र

मुंबई : ‘आंतरराष्ट्रीय एज्युकेशन सिटी’च्या माध्यमातून जगातील श्रेष्ठ अशा १० विद्यापिठांच्या शाखा महाराष्ट्रात येणार आहेत. यांमध्ये उच्च दर्जाचे शिक्षण मिळेल. भारतातील अनेक तरुणांना विदेशात शिक्षणासाठी जायचे असते. हुशार असले, तरी सर्वांनाच त्यासाठी लागणारा व्यय परवडत नाही. ‘आंतरराष्ट्रीय एज्युकेशन सिटी’मुळे विदेशातील शिक्षण २५ टक्के व्ययामध्ये उपलब्ध होऊ शकेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

१४ जून या दिवशी कुलाबा येथील हॉटेल ताजमहाल पॅलेस येथे ‘मुंबई रायसिंग : क्रिएटिंग ॲन इंटरनॅशनल एज्युकेशस सिटी’ हा विदेशातील ५ विद्यापिठांना ‘एल्ओआय’ प्रदान करण्याचा कार्यक्रम पार पडला. याविषयी माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी वरील माहिती दिली. या वेळी केंद्रीय शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान, उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील हे उपस्थित होते.

या वेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘महाराष्ट्रात शाखा स्थापन करण्यासाठी इरादापत्रे देण्यात आलेल्या ५ विद्यापिठांपैकी ‘वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठ’ हे जगातील १०० विद्यापिठांतील नावाजलेले विद्यापीठ आहे. अमेरिकेतील ‘यॉर्क विद्यापीठ’ हे तंत्रज्ञान आणि संशोधन यांसाठी प्रसिद्ध आहे. अशा प्रकारे ही नावाजलेली विद्यापीठे आहेत. या विद्यापिठांमुळे जागतिक शिक्षणाची द्वारे भारतियांसाठी उघडतील. सर्वाधिक वेगाने विकसित होत असलेल्या भारतातील अर्थव्यवस्थेला यातून मनुष्यबळ प्राप्त होईल, तसेच भारताकडून जगाला हवे असलेले मनुष्यबळही यातून प्राप्त होईल. केंद्रीय शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांच्या नेतृत्वाखाली हे काम होत आहे. यामुळे मुंबई एक जागतिक ‘एज्युकेशन हब’ होण्यास प्रारंभ होईल.

येत्या शैक्षणिक वर्षाअखेरपर्यंत ९ विद्यापिठांचा अभ्यासक्रम चालू होतील ! – धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय शिक्षणमंत्री

येत्या शैक्षणिक वर्षाच्या अखेरपर्यंत विदेशातील ९ विद्यापीठे त्यांचा अभ्यासक्रम भारतात चालू करतील. या व्यतिरिक्त विदेशातील अन्य ६ विद्यापिठांशी चर्चा चालू आहे. ‘आंतरराष्ट्रीय एज्युकेशन सिटी’च्या माध्यमातून भारतात उच्च दर्जाचे जागतिक शिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

विकसित भारतासाठी नवीन शैक्षणिक धोरणाचा हातभार लागेल !

प्राचीन काळापासून शिक्षणक्षेत्रात भारताचा जागतिकस्तरावर नावलौकिक राहीला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. नवीन शैक्षणिक धोरणामुळे जागतिक पातळीवरच्या विद्यापिठांनाही त्यांच्या संस्था भारतात चालू करता येणार आहेत. भारतातील शिक्षण संस्थांना परदेशामध्ये शाखा उघडता येणार आहेत. जागतिक दर्जाचे शिक्षण भारतातील विद्यार्थ्यांना अल्प व्ययात उपलब्ध होईल. परदेशी विद्यापीठ भारतात येवून शिक्षण देणार भारताला विकसित बनवण्यासाठी आणि शिक्षणक्षेत्रात पुढे नेण्यासाठी हा निर्णय खूप महत्त्वाचा आहे.