
मुंबई – यशस्वी निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक श्री. विपुल शहा यांचा सनातन संस्थेच्या वतीने ‘सनातन धर्मश्री’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु अनुराधा वाडेकर यांनी श्री. विपुल शहा यांचा सन्मान केला. अंधेरी, मुंबई येथील ‘सनशाईन पिक्चर्स लिमिटेड’ च्या कार्यालयात १३ जूनला हा सन्मान सोहळा पार पडला.
सनातन संस्थेच्या वतीने आयोजित १७ ते १९ मे २०२५ या कालावधीत ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त हिंदु धर्मजागृती आणि राष्ट्ररक्षणासाठी कार्य करणार्या व्यक्तींना ‘हिंदु राष्ट्र रत्न’ आणि ‘सनातन धर्मश्री’ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. काही अपरिहार्य कारणामुळे श्री. विपुल शहा यांना या महोत्सवाला येणे शक्य झाले नव्हते. त्यामुळे मुंबई येथे त्यांना ‘सनातन धर्मश्री’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी झालेल्या सोहळ्याचे सूत्रसंचालन हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. सतीश कोचरेकर यांनी केले. या वेळी ‘सनशाईन पिक्चर्स लिमिटेड’चे निर्माते श्री. आशिन शहा, समितीचे मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्हा समन्वयक श्री. सागर चोपदार, सनातन संस्थेच्या सौ. लता भट आणि श्री. अशोक दाभोलकर उपस्थित होते.
श्री. विपुल शहा यांचा सन्मान करण्याविषयी सूत्रसंचालक श्री. सतीश कोचरेकर म्हणाले, ‘‘श्री. विपुल शहा यांनी ‘लव्ह जिहाद’ या विषयावर ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाची निर्मिती केली. लव्ह जिहाद आणि तरुणींना कट्टरतावाद्यांच्या जाळ्यात ओढण्याच्या घटनांवर आधारित हा चित्रपट वर्ष २०२३ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने केवळ व्यावसायिक यशच मिळवले नाही, तर हिंदु समाजात ‘लव्ह जिहाद’ या संकल्पनेविषयी गांभीर्य निर्माण करण्याचे महत्त्वाचे कार्यही केले. यासोबतच श्री. विपुल शहा यांनी ‘बस्तर : द नक्षल स्टोरी’ या चित्रपटाचीही निर्मिती केली. तो छत्तीसगडमधील बस्तर भागात पसरलेल्या नक्षलवाद आणि दहशतीच्या सत्य घटनांवर आधारित आहे. चित्रपटांमधून विषयांची खोली, अभ्यासाचे गांभीर्य आणि सत्य उघड करण्याचे धाडस दिसून येते. अशा सत्यनिष्ठ आणि राष्ट्रभक्त चित्रपट निर्माता-दिग्दर्शकाचा त्यांच्या धाडसासाठी आणि निर्भयतेसाठी सन्मान करतांना सनातन संस्थेला अत्यंत आनंद होत आहे.’’
या पुरस्काराने मला प्रेरणा मिळेल ! – विपुल शहा
‘सनातन धर्मश्री’ पुरस्कार स्वीकारतांना मी भावान्वित आणि आनंदी झालो आहे. या पुरस्काराने मला प्रेरणा मिळेल. आपल्या हिंदु समाजासाठी माझ्या कामाच्या माध्यमातून अजून काही चांगल्या चित्रपटांची निर्मिती करता येईल, तसेच जागृती आणि निरंतर प्रवास चालू राहील. |
