नाथ समाधी मंदिर परिसरात उभारले जात आहेत नाथांचे शिल्प !

पैठण (छत्रपती संभाजीनगर) – पैठण येथील ‘श्री संत एकनाथ महाराज समाधी मंदिर’ परिसरात नाथ संस्थानकडून होत असलेल्या सुशोभिकरणात नाथांच्या जीवनातील काही प्रसंग हे मूर्त स्वरूपात साकारण्यात आले आहेत. २१ लाख रुपयांच्या २१ शिल्पांतून नाथांच्या जीवनकार्याची अनुभूती देणारे शिल्प बनवण्यात येणार आहेत. हे शिल्प वारकरी, भाविक आणि नागरिक यांना आकर्षित करत आहेत. नाथांचे विविध प्रसंग मूर्तीमध्ये पाहून भाविक आनंदी होत आहेत. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता श्री. राजेंद्र बोरकर यांनी विशेष लक्ष दिले आहे. यापूर्वीही मंदिर परिसरात नाथांच्या जीवनावर तैलचित्र लावण्यात आले आहे.

संत एकनाथ महाराज समाधी मंदिराकडे जाणार्या ५०० मीटर असलेल्या दुभाजकात विविध प्रकारचे शिल्प पूर्वी बसवण्यात आले असून त्यात आता नाथांच्या जीवनचरित्रात घडलेल्या विविध प्रसंगांच्या मूर्ती बसवण्यात आल्या आहेत. त्यामुळे येणार्या भाविकांसाठी संत एकनाथ महाराजांचे जीवनकार्य आता शिल्पातून पहाण्याची मोठी पर्वणी आहे.
नाथ संस्थानचे अध्यक्ष तथा आमदार श्री. विलास भुमरे म्हणाले, ‘‘संत एकनाथ महाराज समाधी मंदिर परिसरात प्रवेश केल्यानंतर एक वेगळ्याच आध्यात्मिक भावविश्वात गेल्याची जाणीव होते. येथे येणारे लाखो भक्त आणि वारकरी यांना संत एकनाथ महाराज यांच्या जीवनातील हे महत्त्वाचे शिल्प ऊर्जा देणारे ठरत आहे. त्यामुळे हेच शिल्प आता भाविकांसाठी आध्यात्मिक ऊर्जा निर्माण करणारे आहे.’’ |
‘‘पैठण येथील संत एकनाथ महाराजांचे मंदिर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. यामुळे याठिकाणी दर्शनसाठी मोठ्या संख्येने भाविक येतात. आता नाथ समाधी मंदिर परिसरात विविध शिल्पांसह नाथ महाराज यांच्या जीवनातील विविध प्रकारचे प्रसंग बसवण्यात आले आहेत. त्यामुळे हे शिल्प येथे येणार्या भाविकांसाठी निश्चितपणे लक्षवेधी ठरत आहे.’’ – श्री. राजेंद्र बोरकर, अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग |