जिवंत रुग्णाला मृत घोषित केले !

आधुनिक वैद्य आहुजा यांचा पराकोटीचा निष्काळजीपणा

मृत घोषित करण्यात आलेले अभिमान तायडे

उल्हासनगर – येथील शिवनेरी रुग्णालयातील अभिमान तायडे (वय ६५ वर्षे) यांना मृत घोषित करून आधुनिक वैद्यांनी त्यांच्या कुटुंबियांना ते मृत झाल्याचे प्रमाणपत्र दिले. प्रत्यक्षात ते जिवंत आहेत. या प्रकरणी आधुनिक वैद्य आहुजा म्हणाले, ‘‘मला रुग्णाची नस मिळाली नाही, तसेच आजूबाजूला गोंगाट असल्याने हृदयाचे ठोके ऐकू आले नाहीत. त्यामुळे मी ते मृत झाल्याचे सांगितले. याविषयी मी खेद व्यक्त करतो, तसेच माझी चूक मान्य करतो.’’

अभिमान तायडे यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांच्या मुलाने त्यांना रिक्शातून रुग्णालयात आणले. आधुनिक वैद्य आहुजा यांनी त्यांची पडताळणी करून त्यांना मृत घोषित केले. मृत समजून अभिमान तायडे यांना त्यांच्या कुटुंबियांनी घरी आणले आणि अंत्यसंस्काराची सिद्धता चालू केली. तेव्हा त्यांच्या छातीची धडधड चालू असल्याचे लक्षात आले. तातडीने त्यांना उल्हासनगरमधील खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. तेथे उपचारांच्या वेळी ते शुद्धीवर आले.

संपादकीय भूमिका

असे आधुनिक वैद्य म्हणजे वैद्यकीय क्षेत्राला कलंकच होत ! सरकारने अशांची मान्यता रहित करून त्यांच्यावर कठोर कारवाई करायला हवी !